खटाव : खटाव येथील अस्ताव्यस्त आणि बेशिस्त पार्किंग तसेच वाहतुकीला पुसेगाव पोलिसांनी हिसका दाखवला. पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा धडाका सुरु होताच अनेक रोडरोमियोंची तारांबळ उडाली. रस्त्यालाच वाहनतळ केलेल्या महाभागांना कडक सुचना देण्यात आल्या तर यापुढेही अशीच कारवाई सुरु राहील, असे सपोनि संदीप पोमण यांनी सांगितले.
खटावमध्ये ऐसपैस आणि रुंद सिमेंट काँक्रिटचे रस्ते असूनही अस्ताव्यस्त पार्किंगमुळे चालणेही मुश्कील होत असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने 28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते. बुधवारी पुसेगाव पोलिसांनी खटावमध्ये रोडरोमियो आणि बेशिस्त वाहनचालकांना पोलिसी खाक्या दाखवला. महाविद्यालय, बस स्थानक, पोस्ट, बँक, ग्रामपंचायत परिसरात रस्त्यावर चारचाकी आणि दुचाकी उभ्या करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पूर्वजांच्या मालकीचा रस्ता असल्यासारखा रस्त्यावरच कायमचा वाहनतळ तयार करणाऱ्यांना पोलिसांनी कडक भाषेत इशारा दिला.
बँक आणि पोस्ट परिसरात नो पार्किंगचा फलक लावण्यासंदर्भात व्यवस्थापनाला सुचना देण्यात आल्या. बसस्थानक आणि बाजारपेठेत मालाची चढ उतार करताना योग्य ती खबरदारी घेण्याविषयी दुकानदारांना सांगण्यात आले. कर्णकर्कश्य सायलेन्सरबाबतही दैनिक ‘पुढारी’त वृत्त प्रसिद्ध झाले होते. खटावमध्ये अशा बुलेटदादांवरही कारवाई करण्यात आली. पोलिसांची कारवाई सुरु होताच खटावच्या रस्त्यांवर पार्किंगला शिस्त लागल्याचे दिसून आले. ग्रामस्थांनी दैनिक ‘पुढारी’ आणि पोलिसांना धन्यवाद दिले.