सातारा : खरीप हंगामात खते, बियाण्याचा तुटवडा भासू नये, या दृष्टीने पुरेशी सतर्कता बाळगा. शेतकऱ्यांना खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
खरीप हंगाम नियोजनाची आढावा बैठक नियोजन भवन येथे झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती लता कर्णे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे उपस्थित होते. पर्जन्यमानाचा अंदाज, खतांचा उपलब्ध साठा, बियाणांचा उपलब्ध साठा, पाण्याचे होणारे आवर्तन, आवश्यक असणारे पाणी त्याचे नियोजन या बाबत चर्चा या बैठकीत झाली.
पालकमंत्री देसाई म्हणाले, बोगस खत विक्री, कमी दर्जाच्या बियाणांची विक्री, खतांसाठी लिंकिंग पद्धत जिल्ह्यात पूर्णपणे बंद झाली पाहिजे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे कोणत्याही पद्धतीने नुकसान होऊन त्यांचा हंगाम वाया जाणार नाही याची आवश्यक ती सर्व खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. पेरणी वाया जाऊ नये यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने पेरणी करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. खत वितरण लिंकिंग पद्धतीने केल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी येत असतात, त्यासाठी भरारी पथकांनी, तपासणी पथकांनी कारवाई करावी. तपासणी पथके ज्यांच्यावर कारवाई करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी सक्षम पुरावे सादर झाले पाहिजेत.
जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अन्यथा दुबार पेरणीचा धोका संभवू शकतो. यावर्षी पर्जन्यमान तुलनेने कमी राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन व्यवस्थित करावे.