मारुल हवेली : यावर्षी पावसाचे लवकर आगमन झाल्याने पाटण तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा उलटून गेला तरी तालुक्यात केवळ 35 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाची सततची रिपरिप सुरू असल्याने पेरणीसह शेतीच्या अंतरमशागतीस अडथळा येत आहे. दरम्यान, तालुक्यात खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्याने उत्पन्नात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
चांगले पर्जन्यमान असलेल्या पाटण तालुक्यात यावर्षी पावसाने चांगलीच पंचाईत केली आहे. जुलै महिना निम्मा होऊनदेखील अजूनही पेरणी पूर्ण झालेली नाही. पावसाचे प्रमाण जास्त असले तरी हंगाम वाया जाऊ नये म्हणून शेतकरी आपल्या पेरण्या उरकण्यावर भर देत आहेत. मात्र त्याला यश येत नाही. तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे 19 हजार 361 हेक्टर क्षेत्रावर हंगामातील खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गतवर्षीच्या तुलनेने ही आकडेवारी फारच कमी असून एकूण क्षेत्राच्या केवळ 35 टक्केच पेरण्या आटोपण्यात आल्या आहेत.
कोयना धरण परिसरासह तालुक्यात इतरत्र पावसाची रिपररिप सुरू आहे. तर काही ठिकाणी पावसाची उघडझाप सुरू असल्याने तेथे पेरण्या सुरू आहेत. मात्र पेरणी पूरक शेत तयार नसल्याने शेतकर्यांना पेरणीसाठी अडचणी येत आहेत. शेतात पाणी साचून राहिल्याने तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर यापूर्वी पेरणी झालेली पिके पिवळी दिसू लागली आहेत. तसेच सततच्या पावसाने पिके कुजून जाण्याचीही भीती शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. दरम्यान, तालुक्यात सरासरी 777 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शिवारासह नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. तर शेतात पाणी साचू लागले. उभ्या पिकांना पावसाच्या पाण्याचा फटका बसतो. पिके पाण्याखाली गेल्याने कुजतात. यामुळ रोप लागवड खोळंबली होती. गेले चार-पाच दिवस पावसाची उघडझाप सुरू असल्याने शेतकर्यांनी पेरणीसह रोप लागवडीवर जोर दिला आहे. भातरोप लागवडीचा हंगाम साधण्यास शेतकर्यांना मदत झाली आहे. शेतातील पाणी कमी झाल्यावर भात रोप लागवडीला शेतकर्यांनी भर दिला आहे. भात रोप लागवडीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
पॉवर ट्रिलरच्या माध्यमातून शेतकरी चिखल करून रोपलागवड करतात. एकमेकांना मदत करून रोप लागवड करण्यात येत आहे. भात रोपलागवडीसाठी भांगलण, कोळपणी व इतर आंतरमशागतीचा खर्च कमी लागतो. यामुळे भात रोप लागवडीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. शेतकर्यांची भात रोप लागवडीसाठी धांदल सुरू आहे. तालुक्याच्या पश्चिमेस शिवारे शेतकर्यांनी भरून गेली आहेत. या भागात वेगवेगळी पिके घेण्यात येतात. भातासह नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. काही ठिकाणी नाचणी पिकाच्या लावणीची कामे सुरू आहेत. शेतकर्यांकडून लवकरात लवकर शेतीची कामे उरकून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डोंगर दर्यांनी व्याप्त पाटण तालुका कृषिप्रधान असून, इथल्या शेतकर्यांचे जीवन संपूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम दरवर्षी संकटात सापडताना दिसतो. कधी पाण्याची टंचाई तर कधी अतिवृष्टी या दोन्ही टोकांच्या घटनांनी शेतकर्यांची झोप उडवली आहे.