खंडाळा : खंडाळ्यातील शिवाजीनगर रस्त्यावरील एका सोसायटीतील तीन बंद फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडून एकूण 2 लाख 38 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांची नोंद खंडाळा पोलिस ठाण्यात झाली आहे.
सोमवारी पहाटे चारच्या सुमारास चार जणांच्या चोरट्यांच्या टोळीने खंडाळा-शिवाजीनगर रस्त्यावरील सोसायटीला लक्ष्य केले. चोरट्यांनी बंद असलेल्या तीन फ्लॅटचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला. यामध्ये किरण ढमाळ यांच्या फ्लॅटमधून पावणे दोन लाखांची अडीच तोळ्यांची सोन्याची माळ आणि 30 हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 2 लाखांचा ऐवज चोरीस गेला.
तसेच समीर चंद्रकांत ढमाळ यांच्या फ्लॅटमधून 28 हजार रुपयांचे चार ग्रॅमचे पैंजण, तर वनिता सावंत यांच्या फ्लॅटमधून 3,500 रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन श्वानपथकाला पाचारण केले. या घटनेतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी किरण ढमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.