लोणंद : खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथीला वेग आला आहे. सातारा जिल्ह्याची ‘मुलुख मैदान तोफ’ म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेण्याचा निर्णायक निर्णय घेतल्याने तालुक्याचे राजकारण हादरून गेले आहे. यामुळे राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे. ना. जयकुमार गोरे, ना. शिवेंद्रराजे भोसले व खा. उदयनराजे भोसले यांनी खेळी करत ना. मकरंद आबांवर कुरघोडी केली आहे.
‘अभी नही तो कभी नही’ या भूमिकेतून एकमेकांच्या गोटातून खेचाखेची सुरू आहे. उमेदवारीची सारी गणिते अक्षरशः कोलमडून पडत आहेत. परिणामी खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी थेट, अटीतटीची आणि अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे ठळक झाली आहेत. मात्र या सत्तासंघर्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आशा-आकांक्षांना मात्र मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने खंडाळा तालुक्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. आतापर्यंत ना. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाची तालुक्यावर पकड मजबूत मानली जात होती. मात्र, ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ना. जयकुमार गोरे यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. शिरवळ, भादे आणि खेड बुद्रुक या तीनही गटांसह सहा गणांमध्ये तुल्यबळ, वजनदार उमेदवार देण्याची रणनीती आखून भाजप अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
त्यातूनच राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील अनेक नेते भाजपच्या वाटेवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. नितीन भरगुडे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयाने तर राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का बसला आहे. या एकाच निर्णयाने खंडाळ्याची राजकीय समीकरणे पुन्हा एकदा नव्याने मांडली जात आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीला जेरीस आणण्यासाठी ना. जयकुमार गोरे आक्रमक झाले असतानाच ना. मकरंद पाटील यांनीही पलटवार करत मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणण्याचा धडाका लावला आहे. खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती व काँग्रेसचे नेते गुरुदेव बरदाडे, माजी जि. प. सदस्य स्वाती बरदाडे, तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत ढमाळ यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून घेतला आहे.
दुसरीकडे ना. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे वाई विधानसभा अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, लोणंद बाजार समितीचे माजी सभापती ॲड. सुभाषराव घाडगे, माजी सभापती व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. एस. वाय. पवार यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केल्याने राष्ट्रवादी गोटात अस्वस्थता पसरली आहे.
नितीन भरगुडे-पाटील यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद गट, गण पातळीवर लक्षणीय वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. विशेषतः शिरवळ, भादे आणि खेड बुद्रुक परिसरात त्यांच्या प्रभावाचा थेट फायदा भाजपला होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नितीन भरगुडे-पाटील यांच्या प्रवेशामुळे खंडाळा तालुक्यातील निवडणूक आता केवळ पक्षीय न राहता प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.