सातारा: खंडाळा तालुक्यासह भोर, फलटण, माळशिरस तालुक्यांच्या दृष्टीने नीरा देवघर प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जातो. या चारही तालुक्यांचे नंदनवन करणारा हा प्रकल्प 2008 साली पूर्ण झाला. त्यामुळे सुमारे 43,050 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र कालव्याची आणि उपसा सिंचन योजनांची अपूर्ण कामे यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी हवालदिल झाला होता.
खंडाळा, फलटण तालुक्याच्या कृषी हरित क्रांतीसाठी लाभदायक ठरणाऱ्या गावडेवाडी, शेखमिरेवाडी आणि वाघोशी या उपसा सिंचन योजनांना राज्य शासनाने तांत्रिक मान्यता देऊन त्याची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याने हा प्रश्न मार्गी लागल्याने तालुकावासीय शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळणार आहे.
नीरा देवघर प्रकल्पाच्या उजव्या कालव्यावर नियोजित खंडाळा तालुक्यातील तीनही उपसा सिंचन योजना मंजूर व्हाव्यात, यासाठी ना. मकरंद पाटील यांनी राज्य शासनाकडे आणि जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला होता. अखेर मंत्री महोदयांच्या पाठपुराव्याला यश आले असून, या उपसा सिंचन योजनांची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नीरा देवघर प्रकल्पातून भोर तालुक्यातील 6670 हेक्टर, खंडाळा तालुक्यातील 11860 हेक्टर, फलटण तालुक्यातील 13550 हेक्टर आणि माळशिरस तालुक्यातील 10970 हेक्टर असे एकूण 43,050 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. वास्तविक या प्रकल्पाचा उजवा कालवा 158 कि.मी. लांबीचा आहे. त्यापैकी पहिल्या 65 कि.मी. कालवा उघड्या पद्धतीने पूर्ण होऊन पाण्याचे आवर्तनही सुरू करण्यात आले आहे. या कालव्यावरील चार उपसा सिंचन योजनांपैकी वेनवडी योजना पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, गावडेवाडी, शेखमीरेवाडी आणि वाघोशी उपसा सिंचन योजना गेली अनेक वर्षे रखडली होती. या भागातील शेतकऱ्यांची वारंवार
होणारी मागणी आणि नीरा देवघरचे पाणीसाठा पूर्ण क्षमतेने होत असताना उपसा सिंचन अभावी पडीक क्षेत्र ओलिताखाली येवू शकत नाही, ही वास्तविकता लक्षात घेऊन मंत्री मकरंद पाटील यांनी ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.
नीरा देवघर प्रकल्पासाठी शासनाने 3976 कोटी रुपयांना मान्यता दिली होती. यापैकी 1315 कोटी रुपये मार्चअखेर खर्च झाले आहेत. त्यामुळे 13874 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे 65 किमी पर्यंत काम पूर्ण झाले असून 66 ते 87 किमी पर्यंतचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर 87 ते 135 किमी पर्यंतच्या कालव्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे.
खंडाळा तालुक्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या उजव्या कालव्याच्या 37 किमी वरील गावडेवाडी या उपसा सिंचन योजनेमुळे तालुक्यातील 2580 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी 70 कोटी खर्च होणार आहेत. तर 47 किमी वरील शेखमिरेवाडी उपसा सिंचन योजनेमुळे तालुक्यातील 2710 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी 75 कोटी खर्च होणार आहेत. तसेच 65 किमी वरील वाघोशी उपसा सिंचन योजनेमुळे खंडाळा तालुक्यातील 2770 हेक्टर क्षेत्र व फलटण तालुक्यातील 3620 हेक्टर क्षेत्र असे एकूण 6390 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
ही योजना पूर्ण करण्यासाठी 130 कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे या तीनही योजना पूर्ण करण्यासाठी सुमारे 275 कोटी निधीची आवश्यकता आहे. ही कामे पूर्ण व्हावीत यासाठी मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून 25 - 26 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 274 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ही कामे निविदा प्रसिद्धीनंतर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.