सातारा : पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची ट्रायल शनिवारी (दि. 17) घेण्यात येणार असून 8 दिवस वाहने सोडण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी, महामार्गाचे रिजनल अधिकारी ए. श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत ही ट्रायल घेतली जाणार आहे. दरम्यान, हा बोगदा सुरू झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुखकर होणार असून, वाहनचालक व प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून मुक्तता होणार आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडी आणि त्यामुळे प्रवासाला होणारा विलंब टाळण्यासाठी नव्याने होत असलेला खंबाटकी बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. 926 कोटी रुपयांचे हे काम आहे. खंबाटकीतील घाटवाटेचा मार्ग हा पुण्याहून साताऱ्याकडे जाण्यासाठी एकेरी करण्यात आला. तर साताऱ्याहून येण्यासाठी बोगदा तयार करत स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला. या स्वतंत्र व्यवस्थेमुळे गेली काही वर्षे वाहतूक सुरळीत आणि गतिमान राहिली. मात्र गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहनांमध्ये वाढ झाल्यानंतर हा एकेरी मार्ग आणि बोगदा मार्ग अपुरा पडू लागला. त्यामुळे नवीन बोगद्यांची कामे हाती घेण्यात आली.
सातारा-पुणे महामार्गावर प्रतिदिन 22 हजार असणारी वाहनांची संख्या आता 55 हजारांवर पोहोचली आहे. या मार्गावरील वाहनांची संख्या वाढल्यानेदेखील कोंडी आणि अपघाताचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले होते. खंबाटकीच्या नवीन बोगद्यासाठी वेळे गावापासून (ता. वाई) हरिपूर ते खंडाळा दरम्यान 6.3 किलोमीटर लांबीचा नवीन सहापदरी रस्ता होत आहे. यामध्ये दोन स्वतंत्र बोगद्यांचे नियोजन आहे. 16.16 मीटर रुंद व सुमारे 9.31 मीटर उंच असणाऱ्या या
बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन मार्गीकेचे रस्ते तयार होत असून येथून दुहेरी वाहतूक होणार आहे. बोगद्यातून रस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्गही ठेवला आहे. अत्याधुनिक सर्व यंत्रणांसह हा बोगदा तयार करण्यात आला. बोगदा रस्त्यावर आपत्कालीन रस्ताही बनवण्यात आला आहे. त्याचा उपयोग अपघात प्रसंगी वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे.