बामणोली : कास पुष्प पठार रविवारी पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले शनिवारी गौरी-गणपती विसर्जन झाल्यानंतर रविवारी फुलांचा बहर पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून, तसेच देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांनी पठारावर मोठी गर्दी केली.
पठारावर सध्या चवर, तेरडा, आभाळी, नभाळी, नीलिमा, टूथब्रश, आमरी, सोनकी, भारंगी, विघ्नहर्ता, गवेली, जरतारी, थिरमिर, कंदील पुष्प, रोशरा, निचुरडी, राणजिरा, जैनी, अबोलीमा, फुलकांडी, फुलदाणी आदी विविध प्रकारची फुले पूर्ण क्षमतेने फुलली आहेत. तसेच पिवळ्या ‘मिकी माऊस’ फुलांचाही साज आता पठारावर दिसू लागला आहे. फुले पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांसाठी समितीच्या वतीने दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. पठाराच्या अलीकडे कासानी पार्किंग, तर पलीकडे कास तलावानजीक कास पार्किंग अशी दोन वाहनतळे आहेत.
रविवारी सकाळच्या पहिल्या सत्रात आलेली सर्व वाहने कास पार्किंगमध्ये उभी केली. मात्र, हे वाहनतळ पूर्ण भरल्यानंतर उर्वरित वाहने कासानी पार्किंगमध्ये वळविली. दुपारी एकच्या सुमारास कासानी पार्किंगही पूर्णपणे भरल्याने येणारी वाहने कास पार्किंगमध्ये पाठविली. त्यामुळे पठारावर येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने एकेरी वाहतुकीचे नियोजनही काही काळ कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळाले. दोन्ही बाजूंना केलेले वाहनतळ तसेच सुट्टीच्या दिवशी पठारावर येणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता, दोन्ही वाहनतळे पार्किंगसाठी अपुरी पडत आहेत.
पर्यटकांसाठी विविध प्रेक्षणीय पॉईंट तयार केले आहेत. त्यामुळे एका वाहनातून पठारावर गेलेला पर्यटक पूर्वी एक ते दोन तासांत परतत असे; मात्र आता तीन-तीन तास फेरफटका मारत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी पायी फिरावे लागत असल्याने सुट्टीच्या दिवशी वाहनतळे लवकरच भरत आहेत. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांच्या वेळेबाबतही आता नियोजन करण्याची गरज आहे. पठारावर उभारलेल्या वॉच टॉवरवरून पर्यटक कास तलाव तसेच कण्हेर जलाशयाचे विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिपताना दिसत आहेत.