सातारा : नानाविध रंगीबेरंगी फुलांनी बहरलेल्या कास पठाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या पठारावर अॅटलास मॉथ (पतंग) जातीचे फुलपाखरुआढळून आले आहे. दक्षिण पूर्व आशियात आढळणारे हे फुलपाखरु सह्याद्रीत आढळल्याने पश्चिम घाटातील जैवविविधता दुर्मीळ फुलपाखरांनी समृद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे.
‘अॅटलॉस मॉथ’ हे दुर्र्मीळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असल्याचे समजते. निसर्गप्रेमी रवी चिखले यांनी हे फुलपाखरु आपल्या मोबाईल कॅमेर्यात चित्रबद्ध केले. पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार असलेले त्याचा रंग आकर्षक बदामी तपकिरी व किंचित लालसर आहे. त्याची लांबी ही सुमारे 10 ते 11 इंच आहे. त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके आहेत, त्यामुळे त्याला ‘अॅटलास मॉथ’ असे म्हणतात, असे पर्यावरण अभ्यासकांनी नमूद केले. नरापेक्षा मादी आकाराने मोठी असते. ही मादी नराला प्रणयासाठी आकर्षित करण्यासाठी फेरोमोन्स नावाचे संप्रेरक हवेत सोडते. नराला फेरमोन्सचा गंध हा काही किलोमीटर अंतरावरून येतो.
याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट, अळी असतानाच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम 5 ते 7 दिवसांचे असते. या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारस मागे ठेवून हे पतंग मरतात. शक्यतो रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होणारा पतंग निशाचर आहे. क्वचितच दिवसा आढळतात. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात प्रकर्षाने दिसतात. हा पतंग दालचिनी, लिंबू, जांभूळ, पेरु व लिंबू वर्गीय झाडांवरच आढळतो.
पश्चिम घाटामध्ये आढळणार्या फुलपाखरांपैकी आकाराने सर्वात मोठे असणारे ‘अॅटलॉस मॉथ’ हे फुलपाखरु आहे. त्याला पतंग असे संबोधण्यात येते. टसर मॉथ प्रकारामध्ये याचा समावेश होत असून त्याचा आकार इतर फुलपाखरांच्या तुलनेत मोठा असतो. त्याच्या पंखावर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असल्याने त्याला अॅटलॉस मॉथ म्हटले जाते.- डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक