Kas Plateau 
सातारा

Kas Plateau : कास बहरले; जपानी पर्यटकही भारावले

गुलाबी तेरड्याच्या फुलांचा गालिचा; विविधरंगी फुलांची पर्वणी

पुढारी वृत्तसेवा

बामणोली : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पुष्प पठार सध्या पूर्ण क्षमतेने बहरले आहे. सर्वत्र गुलाबी तेरड्याच्या फुलांचे आकर्षक गालिचे पसरले आहेत. फुलांचा मुख्य हंगाम सुरू झाल्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले कासकडे वळू लागली आहेत. गुरुवारी जपानमधील सहा पर्यटकांच्या ग्रुपने कास पठाराला भेट देत फुलांचा आनंद लुटला.

जपानी पर्यटकांचे समितीचे माजी अध्यक्ष संतोष आटाळे, दत्तात्रय किर्दत यांनी स्वागत केले. यावेळी पर्यटकांना पठारावरील विविध फुलांची माहिती देण्यात आली. नव्याने तयार करण्यात आलेले पॉईंट पाहून जपानी पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. सध्या पठारावर गुलाबी तेरड्याच्या फुलांचे गालिचे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. आगामी काळात चवर, तेरडा यांसह पिवळ्या रंगाची ‘मिकी माऊस’, पांढऱ्या रंगाची गेंद आणि अन्य विविधरंगी फुलांचे गालिचे पाहण्याची पर्वणी पर्यटकांना मिळणार आहे. दरवर्षी कासच्या फुलांचा बहर पाहण्यासाठी देश-विदेशातून हजारो पर्यटक येथे दाखल होतात. यंदाही फुलांचा हंगाम बहरात आल्याने आगामी काळात पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

आणखी महिनाभर हंगाम चालणार असल्‍याने विविधरंगी फुलांची पर्वणी पर्यटकांसाठी राहणार आहे. पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी कास व्‍यवस्‍थापन समिती, वन विभाग आणि पोलिसांकडून नियोजन करण्‍यात आले आहे. पोलिसांची तैनाती, ऑनलाईन बुकिंग, इलेक्‍ट्रिक वाहने अशा उपाययोजना करण्‍यात आल्‍या आहेत. तर, वन विभागाच्‍या वतीने यंदा प्रथमच विविध सुविधा देण्‍यात आल्‍या आहेत. या सुविधांचा फायदाही पर्यटकांना होत आहे. त्‍यामुळे जसे पठार फुलत आहे, तशीच पर्यटकांचीही वर्दळ दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT