निसर्गरम्य कार पठारावरील अल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.  Pudhari Photo
सातारा

Kas Pathar | कास पठारावर मे महिन्यातच फुलांचा बहर!

मान्सूनपूर्व पावसाची कृपा; पठार पर्यटकांनी बहरले

पुढारी वृत्तसेवा

सातारा : गेल्या आठवड्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. याचाच परिणाम म्हणून जगप्रसिद्ध कास पठारावर यंदा मे महिन्यातच विविध प्रकारची फुले उमलण्यास सुरुवात झाली आहे.

ही फुले दरवर्षी जुलैच्या शेवटच्या आठड्यापासून फुलायला सुरुवात होतात. ती दोन महिने आधीच फुलत आहेत. त्यामुळे पावसाची रिमझिम आणि दाट धुके यामुळे निर्माण झालेल्या अल्हाददायक वातावरणामुळे पर्यटकांची पावले आतापासूनच कास पठाराकडे वळू लागली आहेत.

गेले काही दिवस कास पठार परिसरात पावसाची उघडझाप सुरू आहे. या परिसरातील सुखद आणि आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी सातार्‍यासह राज्यभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. बुधवारी कास पठारावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सातारी तुरा, सोनतारा, भुईकांदा, सापकांदा, अंजन अशा अनेक प्रकारची लहान-मोठी फुले आतापासूनच दिसू लागली आहेत. पठारावरील थंड हवा, धुके, रिमझिम पाऊस आणि त्यातच उमललेली विविध रानफुले यामुळे कास पठारावर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

दुर्मीळ फुलांनी वेधले लक्ष

पठारावरील खडकातून डोकावणारी ही फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत, आणि पर्यटक त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत. फुलांचा बहर पूर्णपणे सुरू व्हायला अजून वेळ असला, तरी येथील आल्हाददायक हवामानाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.

सातारी तुर्‍याचा सुगंध

सातार्‍याच्या पश्चिम भागात सातारी तुरा हे दुर्मिळ फूल आढळते. या फुलाच्या सुगंधामुळे विविध प्रकारचे कीटक आकर्षित होतात. त्याशिवाय सोनतारा, भुईकांदा, सापकांदा, अंजन अशा विविध प्रकारच्या जातीची छोटी-मोठी फुले यायला आत्ताच सुरुवात झाली आहे. चपटे ऑर्किडची फुलेही पर्यटकांना मोहित करत आहेत. गवतामध्ये लपलेली रानफुले आणि खडकातून डोकावणारी काही वनस्पती देखील दिसू लागली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT