सातारा : सातारा शहर व तालुक्यातील दळणवळण व्यवस्था व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले कास-बामणोली मार्ग आता प्रमुख जिल्हा मार्ग क्र. 26 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. राज्य शासनाने याबाबत घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील रस्त्यांच्या लांबीत वाढ झाली आहे.
कास-घाटाई-बामणोली रस्त्याची दर्जोन्नती झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलसा मिळाला आहे. हा मार्ग सुकर होणार असल्याने पर्यटनवाढीस चालना मिळणार आहे. या बदलामुळे निर्माण झालेल्या रिंगरोडमुळे सातारा शहर वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 26 (प्र.जि.मा.26) मध्ये मूळ 8 कि.मी. लांबी वाढवण्यात आली होती. मात्र, त्यावेळी घाटाई देवी फाटा, कास पुष्प पठार, कास धरण भिंत अशी एकूण 4 कि.मी. लांबी वगळण्याची गरज लक्षात न घेतल्यामुळे एकूण लांबी 108.850 कि.मी. झाली होती. दरम्यानच्या काळात, नागरिकांच्या गैरसोयीचा विचार करून सातारा नगरपरिषदेमार्फत 1200 मीटर लांबीचे व 12 मीटर रूंदीचे पर्यायी बाह्यवळण तयार करण्यात आले. हे वळण पाण्याखाली जाणार्या भागावरून जात असून ते पर्यटक व स्थानिकांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे.
ही रचना पर्यटनासाठी आणि स्थानिक रहदारीसाठी उपयुक्त असल्याने सदर बाह्यवळण सार्वजनिक बांधकाम उपविभाग सातारा यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी रा.म.मा.क्र. 4 संभाजीनगर (सातारा)-जगतापवाडी-पॅरेंट्स स्कूल- बोगदा (सातारा) हा सुमारे 5 कि.मी. लांबीचा रस्ता प्र.जि.मा. 23 मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. आता त्याच रस्त्याचा समावेश प्र.जि.मा. 26 मध्ये करण्यात आला आहे.
या नव्या समावेशामुळे प्र.जि.मा. 26 ची लांबी 5 कि.मी.ने वाढून 113.850 कि.मी. झाली असती. मात्र, त्यात घाटाई देवी फाटा-कास पुष्प पठार-कास तलाव ते कास तलाव भिंत ही 4 कि.मी. लांबी वगळण्यात आल्याने अंतिम लांबी 109.850 कि.मी. झाली आहे. वगळण्यात आलेली लांबी ‘प्र.जि.मा. 26 अ’ म्हणून स्वतंत्र संबोधण्यात येणार आहे.
संपूर्ण सुधारणा केल्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा मार्गांच्या एकूण लांबीत 1 कि.मी. ने वाढ होऊन ती 3807.800 कि.मी. इतकी झाली आहे. या रस्त्यांचा वापर करणार्या स्थानिक गावांमध्ये वाढती लोकसंख्या, दळणवळणाची गरज आणि सातारा नगर परिषदेची तांत्रिक मागणी या सर्व बाबी लक्षात घेऊन हा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सातारा-कास-बामणोली-तापोळा-महाबळेश्वर या पर्यटक प्रिय मार्गाचे दर्जोन्नतीकर होऊन रस्त्याची सुसज्जता आणि सुरक्षितता वाढणार आहे. भविष्यातील पर्यटन वृद्धी, स्थानिक उद्योगांचे बळकटीकरण आणि आपत्कालीन सेवा अधिक वेगाने पोहोचवण्यास मदत होणार आहे. या रस्त्याच्या गुणवत्तेमुळे निसर्ग पर्यटनाला चालना मिळेेल तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे.
सातार्यातील कास परिसर व बामणोलीमार्गे महाबळेश्वर जोडणारा हा रस्ता पर्यटनाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. स्थानिक गरजा, पर्यटनवाढ आणि नागरी सुविधा लक्षात घेऊन प्र.जि.मा. 26 मध्ये समावेश करण्यात आला आहे. रस्त्याचे दर्जोन्नतीकरण हे सातारा जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. शासन नागरिकांच्या सोयीसाठी कायम तत्पर आहे.ना. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री