सातारा

Krishna River: कृष्णा नदीच्या संवर्धनासाठी कराडात व्यापक चर्चा

नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, लोकप्रतिनिधींकडून सकारात्मक प्रतिक्रिया; कठोर उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कराड : दैनिक ‌‘पुढारी‌’मध्ये प्रसिद्ध झालेल्या कृष्णामाईला कराडकरांची लाज वाटू नये... या लेखानंतर कराड शहरासह परिसरात नदीप्रदूषण आणि नदी संवर्धनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या लेखामुळे सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, प्राध्यापक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत असून, कृष्णा-कोयना नदी संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अशोक शेलार यांनी कृष्णा-कोयना या केवळ नद्या नसून त्या संस्कृती आणि श्रद्धेचे प्रतीक असल्याचे सांगत नदीत कचरा टाकणे म्हणजे संस्कारांचा पराभव असल्याची भावना व्यक्त केली. प्रा. डॉ. इला जोगी यांनी गुजरातमधील नर्मदा नदी संवर्धनाचे उदाहरण देत कराडमध्येही कठोर नियमांची आवश्यकता अधोरेखित केली.

डॉ. रमेश लोखंडे यांनी नदी प्रदूषणाकडे कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पाहण्याची गरज व्यक्त करत नदीत कचरा टाकणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी वारुंजी परिसरातील कचऱ्याच्या प्रश्नावर प्रशासन लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

माजी नगरसेवक फारुख पटवेकर यांनी ग्रामीण भागातूनही नदीकाठावर कचरा टाकला जात असल्याचे वास्तव मांडत ग्रामपंचायतींनाही जबाबदार धरण्याची आवश्यकता व्यक्त केली. बांधकाम व्यावसायिक नंदकुमार साळुंखे यांनी पुलांवरून कचरा फेकणाऱ्यांवर संताप व्यक्त करत सामाजिक संवेदनशीलता कमी होत असल्याची खंत व्यक्त केली.

राहुल कुंभार यांनी नागरिकांच्या अडचणींकडे लक्ष वेधत कचरा व्यवस्थापनासाठी पर्यायी सुविधा उभारण्याची गरज अधोरेखित केली. फक्त दंड नव्हे, तर सक्षम व्यवस्था आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे कृष्णामाई संवर्धनासाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

भविष्याचा विचार करता नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. नदीपात्र दूषित होणार नाही किंवा नदी काठावर कचरा टाकला जाणार नाही याबाबत दक्षता घेतली पाहिजे. विधानसभेत याबाबत चर्चा घडवू
-आ.डॉ.अतुलबाबा भोसले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT