सातारा

कराड : पालिका आमदार समन्वयात कमी कोण पडले?

backup backup

कराड; प्रतिभा राजे : नगरपालिकेच्या गेल्या सत्तेत एकमेकांची उणीदुणी काढणे, आरोप प्रत्यारोप, प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव यामुळे कराडचे अनेक प्रश्न मार्गी लागायचे राहून गेले. त्यातच आमदार आणि पालिका यांच्यामध्ये समन्वय नसल्याने कराडसह ग्रामीण भागाचा विकास संथ गतीने होत असल्याची खंत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखवली. मात्र, या समन्वयात नक्की कोण कमी पडले? आ. चव्हाण यांनी बोलून दाखवलेली ही खंत बरेच काही सांगून जात आहे.

कोयनेश्वर मंदिर सुशोभीकरण व बंदिस्त गटर कामाच्या प्रारंभ प्रसंगीच्या कार्यक्रमात त्यांनी पालिकेकडून प्रस्ताव आले नसल्याने निधी तेवढ्या प्रमाणात देता आला नाही हे त्यांनी यावेळी स्पष्ट बोलून दाखवले.

जर पालिकेकडून याबाबतचे प्रस्ताव आ. चव्हाण यांचेकडून गेले असते तर ग्रामीण भागाचा विकास आणखी गतीने झाला असता. मात्र, उदासीन धोरणामुळे हा विकास गतीने होऊ शकला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गत सत्तेत भाजपामध्ये असणारे तीव्र मतभेद, यशवंत जनशक्ती लोकसेवा आघाडीत झालेली फूट, तसेच मानापमान यामुळे पालिकेत खेळखंडोबा झाला. पृथ्वीराज चव्हाण यांचे सत्तेत असणारे नगरसेवक राजेेंद्र माने व इंद्रजित गुजर यांची तटस्थ भूमिकाही यास मारक ठरली आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून आतापयर्यंत 10 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे.

पावसाळ्यात साचून राहणार्‍या निचर्‍यासाठी बंदिस्त गटार बांधणीला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच कोटी रुपयांचा निधी दिला. तो निधी अद्यापही वापराविना पडून आहे. कराड शहरात ग्रामीण भागाची हद्दवाढ होऊन 15 वर्षे झाली. मात्र, या 15 वर्षांत तेवढ्या प्रमाणात विकास झाला नाही.

अजूनही पाणी, वीज, रस्ते या मुलभूत गोष्टींसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. निधी मंजूर झाला, प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला तरी ठेकेदारावर अंकुश नसल्याने अनेक कामे रखडली गेली आहेत.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकेच्या उदासिनतेची खंत व्यक्त केली. यामुळे पुन्हा पालिकेमध्ये असणार्‍या समन्वयाचा अभाव व उदासिनता समोर आली आहे.

राजकीय इगोमुळे विकासकामे रखडली

पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. सदाभाऊ खोत यांच्या फंडातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असला तरीही कामे अर्धवट झाली आहेत. पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. आता प्रशासनावर अंकुश ठेवणारे कोणी नसल्याने ही कामे केव्हा होणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली आहे.

पालकमंत्र्यांकडून गतीने निधी मंजूर

पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनीही आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी कराड ग्रामीण भागासाठी मंजूर करून आणला आहे. यामधील अनेक कामांचा निधी मंजूर होऊन कामे सुरूही झाली आहेत. हे त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींच्या तत्परतेचाही परिणाम आहे. मात्र, यासाठी आग्रही राहणे गरजेचे आहे. त्यामुळेच ही कामे मंजूर झाली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT