सातारा

कराड : अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत

backup backup

कराड : पुढारी वृत्तसेवा

कराड शहरासह तालुक्यावर मागील दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसासह वादळी वार्‍याचे संकट पहावयास मिळत आहे. शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने हुलकावणी दिल्यानंतर शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत तालुक्यात ढगाळ वातावरण होते. मात्र पावसाने हुलकावणीच दिली होती. मात्र शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत अवकाळी पावसाने कराड शहरासह तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले होते.

कराड शहरात दोन आठवड्यापूर्वी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कराड शहरासह परिसरात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले होते. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजाला दिलासा मिळाला. शनिवार सकाळपासून दुपारपर्यंत तालुक्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर मात्र ऊन पडले होते. त्यामुळेच तालुक्यावरील अवकाळी पावसाचे संकट कायम होते.

शनिवारी मध्यरात्रीनंतर पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. विशेष म्हणजे वादळी वारे नसल्याने कराड शहरात विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू होता. मात्र, आटकेसह परिसरात मध्यरात्रीपासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

रविवारी आठवडा बाजार असल्याने सकाळी 11 वाजेपर्यंत कराडच्या भाजी मंडई परिसरात भाजी विक्रेत्यांची धावपळ सुरू होती. सुदैवाने 11 नंतर पावसाने उघडीप घेतली. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. तालुक्यातील ग्रामीण भागांत ऊस तोडीवरही अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम झाल्याचे पहावयास मिळत आहे.

नुकसानीच्या शक्यतेने बळीराजा हवालदिल…

तालुक्यात कारखान्याचे गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहचले आहेत. याशिवाय गहू, हरभरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. असे असताना वारंवार ढगाळ वातावरण तयार होत असल्याने कराड तालुक्यातील बळीराजा हवालदिल झाल्याचे पहावयास मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT