ड्रेनेज file photo
सातारा

Karad drainage project row as BJP leaders ignored-निधी महायुतीचा; पण भाजप नगरसेवकांना निमंत्रणाचा ठेंगा !

कराडच्या भुयारी गटार योजनेच्या भूमिपूजनावरून नाराजीचा धुरळा; आमदारांनाही डावलल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

कराड : पुढारी वृत्तसेवा

कराड शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाला गती देण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेंतर्गत भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक २ मधील शनिवार पेठ येथे ड्रेनेज पंपिंग स्टेशन क्रमांक एक उभारण्यात येत आहे. या विकासकामाचा भूमिपूजन सोहळा सोमवारी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्यापेक्षा या कार्यक्रमाला भाजपच्या नगरसेवकांना निमंत्रण न दिल्याचा मुद्दाच आता कराडच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे महायुतीच्या व्यासपीठावर विकासकामांचे श्रेय घेताना घटक पक्षांनाच डावलले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

या कार्यक्रमाला भाजपच्या नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले नसल्याने गटनेते तथा नगरसेवक विजयसिंह वाटेगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असताना आणि त्यातून नगरपालिका हद्दीत विकासकामे होत असताना स्थानिक आमदार डॉ. अतुलबाबा भोसले व भाजपच्या लोकप्रतिनिधींना मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केवळ याच कार्यक्रमात नव्हे,

तर यापूर्वीही अनेक विकासकामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळ्यांना भाजपच्या नगरसेवकांना निमंत्रण दिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, आगामी काळात कराड शहरातील विकासकामांच्या श्रेयवादावरून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकमंत्री, माजी मंत्री आणि स्थानिक आमदार अशा प्रमुख राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये घटक पक्षांच्या लोकप्रतिनिधींना समान सन्मान मिळणार का, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कराडच्या विकासासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे अपेक्षित असताना भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून महायुतीतील नाराजी समोर आली आहे. त्यामुळे कराडमध्ये विकासकामांचा धडाका सुरू असला, तरी महायुतीतील समन्वयाचा पंप मात्र अडखळतोय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

निधी महायुतीचा, मग भाजपला डावलण्याचे कारण काय?

महायुतीच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी आणला जातो; मात्र त्या विकासकामांच्या कार्यक्रमांमध्ये महायुतीतील भाजपच्या नगरसेवकांना स्थान दिले जात नसेल, तर ही बाब योग्य नाही, अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांनी मांडली आहे. नगरपालिकेकडून फोन केले जातात, व्हॉट्स अॅपवर निमंत्रण पत्रिका पाठवली जाते, असे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाला बोलावले जात नसल्याचा आरोपही वाटेगावकर यांनी केला आहे.

आमदारांचा फोटो फलकावर; मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव गायब

या संपूर्ण प्रकरणात आणखी एक राजकीय मुद्दा चर्चेत आला आहे. यापूर्वी झालेल्या काही विकासकामांच्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांमध्ये स्थानिक आमदार डॉ. बाबा भोसले यांचे नाव नसल्याची बाब समोर आली होती. काही कार्यक्रमांच्या फलकांवरही त्यांचा फोटो नसल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात मात्र कार्यक्रमाच्या फलकावर आमदार डॉ. भोसले यांचा फोटो लावण्यात आला होता. परंतु निमंत्रण पत्रिकेत त्यांचे नाव नसल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला तोंड फुटले आहे. फलकावर फोटो आणि निमंत्रण पत्रिकेत नाव नाही, त्यात भाजपच्या नगरसेवकांनाही निमंत्रण नाही, अशा परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींना केवळ औपचारिकतेपुरते स्थान दिले जात आहे का, असा प्रश्न भाजपच्या नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT