Karad News: वाहतूक पोलिस चौकीवर गुंडाला श्रद्धांजली Pudhari
सातारा

Karad News: वाहतूक पोलिस चौकीवर गुंडाला श्रद्धांजली

पोलिसांच्या नावलौकिकाला धक्का; पालिकेसह पोलिस कुंभकर्णाच्या भूमिकेत

पुढारी वृत्तसेवा
चंद्रजीत पाटील

कराड : वाहतूक नियंत्रण करणे सोपे व्हावे यासाठी एका सामाजिक संस्थेने वाहतूक पोलिसांना पदरमोड करून शहरातील शाहू चौकात छोटीशी पोलीस चौकी बांधून दिली आहे. मात्र ही चौकी नेहमी बंदच असते. या चौकीवर मागील चार दिवसांपासून एका नामचीन गुंडाला श्रद्धांजली वाहणारा फलक दिमाखात झळकत आहे. पोलीस चौकीवरच गुंडाची आठवण जागविणारा फलक लागूनही प्रशासन विशेषत: पोलीस बघ्याची भूमिकेत असल्याने कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे अक्षरश: शाहू चौकात टांगली गेली आहेत.

तोंडे पाहून जाहिरात, श्रद्धांजली अथवा अभिनंदन करणाऱ्या फ्लेक्सवर कारवाई करणारे नगरपालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांचा ढोंगीपणा यापूर्वी अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. नगरपालिकेचे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्तेच विनापरवाना फलक लावत पालिकेच्या तिजोरीवर अक्षरश: डल्ला मारतात आणि हे कराडकरांनी यापूर्वी अनेकदा अनुभवले आहे. फलक हा विषय आपला नाही असे सांगून पोलीस प्रशासनही हात झटकते आणि ते त्यांचे एक प्रकारे योग्यही असेलही. मात्र कोणीही कुठेही अक्षरशः वाहतूक पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या चौकीवरही फलक बांधला तरी नगरपालिकाच काय पण वाहतूक चार - चार दिवस त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत याचा प्रत्येक यापूर्वी अनेकदा आला असून मागील चार दिवसापासून येत आहे.

गुंडांना रोखणे हे पोलिसांचे काम असले तरी वर्षभरापूर्वी मृत्यू पावलेल्या एका नामचीन गुंडाला श्रद्धांजली वाहणारा आणि त्याची आठवण जागविणारा एक फलक शाहू चौकातील वाहतूक पोलीस चौकीवर मागील चार दिवसांपासून झळकत आहे. हे कमी होते की काय म्हणून यात चौकीच्या विरुद्ध बाजूला एका खाजगी व्यावसायिकांनी आपल्या दुकानाची जाहिरात करणारा फलक लावला आहे.

मात्र असे असूनही नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन फलक हटवत नाही. पोलीस चौकीवरच गुंडाचा फलक चार दिवस झळकत असल्याने आणि तो काढला जात नसल्याने या चौकातून जाणारा प्रत्येक नागरिक आश्चर्याने पाहत असून पोलिसांच्या नावलौकिकास ठेच पोहचत आह. मात्र नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाला याचे काहीच देणे-घेणे नसल्यासारखी परिस्थिती असून कुंभकर्णाच्या भूमिकेतील प्रशासन कधी जागे होणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT