Karad News | करावरील शास्ती माफीचा दिलासा File Photo
सातारा

Karad News | करावरील शास्ती माफीचा दिलासा

कराड नगरपालिकेलाही वसुलीसाठी सहाय्य; आतापर्यंत 200 अर्ज दाखल

पुढारी वृत्तसेवा
प्रतिभा राजे

कराड : कराड नगरपालिकेने थकीत मालमत्ता करदात्यांसाठी राबविलेल्या अभय योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत थकीत करांवरील दंडात 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे आतापर्यंत 200 नागरिकांनी या योजनेसाठी नगरपालिकेत अर्ज दाखल केले आहेत. या योजनेमुळे थकीत मिळकतधारकांनी थकबाकी भरण्यास प्रारंभ केल्यामुळे पालिकेला करवसुलीसाठी या योजनेचा मोठा हातभार लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्जासाठी 31 जुलैपर्यंत मुदत असल्याने 50 टक्के दंड माफीसाठी मिळकतधारक कर भरण्यास तत्परता दाखवत आहेत.

महाराष्ट्र शासनाने कर वसुलीस प्रोत्साहन म्हणून ही योजना सुरू केली असून, या योजनेअंतर्गत सध्या कराड नगरपालिकेतील कर विभागाकडून अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. या अभय योजनेअंतर्गत दंडाचा 50 टक्के पर्यंत माफ करण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांना आहे. 50 टक्के पेक्षा जास्त दंड माफ करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. या योजनेमुळे थकीत कर भरणार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

योजना कार्यान्वित करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले असून, 31 जुलै 2025 ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. या योजनेत केवळ दंडावर सूट मिळणार असून मूळ कराची रक्कम भरावी लागणार आहे. या योजनेमध्ये दि.19 मे 2025 रोजी ज्या थकीत मिळकतधारकांची शास्ती थकबाकी आहे, अशा मिळकतधारकास मालमत्ता करावरील शास्ती अंशतः/पूर्णतः माफ करण्यात येणार आहे. जे मिळकत धारक 50 टक्के शास्ती दंड वगळता इतर थकीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरतील त्यांचे बाबतीतच शास्तीच्या सवलतीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी एकूण शास्तीच्या 50 टक्के पर्यंतच्या शास्ती माफीबाबत अधिकार देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचेकडून 30 दिवसांचे आत पत्र मिळाल्यानंतरच सवलत लागू होणार आहे.

एकूण शास्तीच्या 50 टक्के पेक्षा जास्त सवलत हवी असल्यास प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. शासनाकडून प्रकरण मंजूर, नामंजूर झालेस तसे पत्र प्राप्त झाल्यानंतर शास्ती लागू होईल, प्रकरण मंजूर झाल्यास नमूद शास्ती रक्कम परतावा नगर परिषदेमार्फत केला जाईल किंवा पुढील वर्षाच्या करामध्ये आगाऊ रक्कम म्हणून समायोजित करण्यात येणार आहे.

अभय योजना ही नागरिकांच्या फायद्यासाठी आहे. यामुळे शास्तीची रक्कम भरण्यास सूट मिळणार असल्याने नागरिकांनी दि. 31 जुलै पर्यंतच्या या योजनेचा लाभ घ्यावा.
- प्रशांत व्हटकर, मुख्याधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT