कराड : भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने एका लहान मुलीवर अचानक हल्ला केला. परंतु नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संबंधित मुलगी बचावली असली तरी शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मलकापुरातील शास्त्रीनगर, रानडे हॉस्पिटल परिसरात बुधवार दिनांक १९रोजी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापुरात सध्या भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला आहे. अनेक वेळेला ही भटकी कुत्री लहान मुलांवर तसेच वयोवृद्ध लोकांवर हल्ला करत आहेत. काही वेळेला या भटक्या कुत्र्यांचा त्रास रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांनाही होत आहे. याबाबत अनेक वेळेला तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
बुधवारी सकाळी शास्त्रीनगर, रानडे हॉस्पिटल परिसरात एक लहान मुलगी रस्त्याने जात असताना सहा ते सात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक त्या मुलीच्या दिशेने धाव घेऊन तिच्यावर हल्ला केला. कुत्री आपल्यावर हल्ला करत असल्याचे लक्षात येताच मुलीने आरडाओरडा करून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
मुलीचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सतर्कता दाखवून भटक्या कुत्र्यांना तेथून हुसकावून लावले व संबंधित मुलीचा जीव वाचवला. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत भटक्या कुत्र्यांचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
शास्त्रीनगर परिसरासह मलकापूर शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. भटक्या कुत्र्यांच्या झुंडी अचानकपणे लहान मुलांवर हल्ले करत आहेत. तरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा.- नितीन काशीद-पाटील, नगरसेवक