सातारा

Karad News: सोयाबीन, भात, भुईमूगाची पिके तरारली

कराड तालुक्यात खरीपाची पेरणी पूर्ण; दमदार पावसामुळे पिकांची उगवण समाधानकारक

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड तालुक्यात काही दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावत खरीप हंगामाला नवसंजीवनी दिली आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले असून तालुक्यात खरीपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार, तालुक्यातील ७६ हजार ६२२ हेक्टर सर्वसाधारण खरीप क्षेत्रापैकी ७० हजार ९८७ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून हे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिल्यानंतर काही दिवस अचानक उघडीप राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अनेक ठिकाणी उगवलेल्या पिकांवर पाण्याअभावी ताण निर्माण होऊ लागला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे ही परिस्थिती बदलली आहे. भात, सोयाबीन, भुईमूग, मका, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या वाढीस चालना मिळाली असून शेतात हिरवाई बहरली आहे.

यंदा विशेषतः भुईमुगाच्या लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. पिकांची उगवण चांगली झाल्याने आणि सध्याचे हवामान अनुकूल असल्याने उत्पादनाबाबतही शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. मात्र, पुढील काळात पावसाचा समतोल कायम राहणे आणि रोग-किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, तालुक्यातील ऊस लागवडीची कामेही वेगाने सुरू आहेत. नवीन ऊस लागवडीसाठी निर्धारित १३ हजार ९२९ हेक्टर क्षेत्रापैकी ९ हजार ४९९ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली असून हे प्रमाण ६८.२ टक्के आहे. गाळपासाठीच्या उसाचे क्षेत्र २५.६ टक्के नोंदविण्यात आले आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पिकांची नियमित पाहणी, आवश्यक तेथे तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि रोग-किडींचे वेळेत नियंत्रण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT