उंडाळे : गेले कित्येक वर्षात गुढीपाडव्याला असणारा कडक उन्हाळा यावर्षी प्रथमच कमी झाला आणि कराड दक्षिणेत विजांचा लखलखाट,वादळी वारा व गारपीठीसह जोरदार पावसाने झोडपून काढले. तासाहून अधिकवेळ पाऊस कोसळत होता. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे. शिवाय शेतीला पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी काढणीला आलेला गहू, शाळू, हरभरा या रब्बी पिकांचे पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
कराड दक्षिणच्या डोंगरी भागात गुरूवारी सकाळपासून उन्हाचा कडाका जाणवत होता. सकाळी या विभागातील जनतेने मोठ्या उत्साहाने गुढ्या, तोरणे उभी करत नववर्षाचे स्वागत केले. दुपारी दीडच्या सुमारास अचानक वादळी वारे व प्रचंड गारांसह पावसाने विभागाला झोडपून काढले. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता. अधून मधून विजांचा कडकडाट, जोराने वाहणारे वारे, मोठ्या गारांचा माराही पावसाबरोबर होता. जोरदार पावसाने सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
घराच्या वळचणीवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. चार महिन्यांपासून उन्हाचे चटके कमी अधिक प्रमाणात जाणवत होते. गुरूवारी पुदपारी पावसाने अचानक हजेरी लावली. उंडाळे, ओंड,नांदगाव,टाळगाव,घोगाव,साळशिरंबे, मनू,जिंती,तुळसण,सवादे यासह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक सुरू झालेल्या पावसाने रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
सध्या काढण्यासाठी आलेला गहू, शाळू, हरभरा या पिकांचे पावसाने मोठे नुकसान झाले. रब्बी हंगामातील गहू,शाळू,हरभरा पिकांची काढणी सर्वत्र जोरात सुरू असताना अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे त्रेधा उडाली. यावर्षी रब्बी हंगाम चांगला होईल असे शेतकऱ्यांना वाटत होते पण अचानक आलेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. शेतात मळणीसाठी काढून ठेवलेला गहू भिजला आहे. यावर्षी आंबा पीक चांगले बहरले आहे. अचानक आलेल्या गारपीठ व वादळी वाऱ्याने आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. आंबा वादळी वाऱ्याचे मोठ्या प्रमाणात झडल्याचे चित्र आहे.