कराड; अकबर शेख : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मागील दोन निवडणुकीत चांगले मताधिक्य देणारा वारुंजी जि.प.गट या निवडणुकीत मात्र भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सातारा डीसीसी बँक निवडणुकीत कराड तालुक्यात निर्माण झालेल्या दरीचा प्रभाव याही निवडणुकीत कायम दिसला. त्यामुळे वारुंजी गटावर महाविकास आघाडीमधील बिघाडीचा परिणाम स्पष्ट जाणवला. भाजपचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा तब्बल 3,348 मते जास्त मिळाली. विशेष म्हणजे वारुंजी गटात समाविष्ट 12 गावांपैकी 10 गावांनी भोसले यांना तर केवळ 2 गावांनी चव्हाण यांना मताधिक्य दिले. डॉ. अतुल भोसले यांच्या अथक परिश्रमाला यश आल्याने येणार्या निवडणुकांसाठी काँग्रेसला मात्र ही धोक्याची घंटा आहे.
कराड आणि मलकापूर शहरांलगतचा परिसर अशी ओळख असणार्या वारुंजी जि.प. मतदारसंघातील निवडणुकीचे वातावरणही या दोन शहरांमधील वातावरणावरच बरेचसे अवलंबुन असते, हे याही निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे पृथ्वीराजबाबा आणि उंडाळकर काका गट एकत्र होते. मात्र महाविकास आघाडीतील आ.बाळासाहेब पाटील यांना मानणारे प्रमुख कार्यकर्ते मात्र पुर्ण ताकतीनिशी डॉ.अतुल भोसले यांच्यासोबत दिसत होते. या गटात अॅड.उदयसिंह पाटील यांनी प्रत्येक गावात प्रचार यंत्रणा राबवली. तर माजी आमदार आनंदराव पाटील यांनी भाजप उमेदवार डॉ.अतुल भोसले यांना सर्वोतोपरी साथ दिल्याचे दिसले. महाराष्ट्रात लाडकी बहिण आणि बाधकाम कामगार योजनांमुळे महायुतीला जे जनसमर्थन मिळाले ते कराड दक्षिणमधील या गावांमध्ये ते वातावरण पोहचविण्यात भाजपच्या नेतेमंडळींना यश आलेले दिसले. याशिवाय लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी गेलेले एकगठ्ठा मुस्लिम मतदान विधानसभा निवडणुकीत मात्र फक्त काँग्रेसकडे न जाता ते मतदान अतुल भोसले यांनाही मिळाल्याचे दिसले. गोटे, मुंढे, वारुंजी, वनवासमाची, खोडशी या गावांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. या निवडणुकीत दोन्ही ऊमेदवारांमध्ये ही मते विभागली.
वारुंजी गटातच गोटे गावात राहण्यास असणारे माजी खासदार श्रीनिवास पाटील, सारंग पाटील हे दोघेही या निवडणुकीतील प्रचारात कोठेही विशेष सक्रीय दिसले नाहीत. काँग्रेसने वारुंजी पंचायत समिती मतदारसंघाची जबाबदारी माजी सदस्य नामदेव पाटील यांच्यावर तर कोयना वसाहत पंचायत समितीची जबाबदारी जखिणवाडीचे माजी आदर्श सरपंच अॅड. नरेंद्र नांगरे पाटील यांच्यावर सोपवली होती. भाजपने मात्र प्रत्येक गावात कार्यकर्तेंची सशक्त यंत्रणा निर्माण केली होती. प्रत्येक गावात ही यंत्रणा गेल्या चार सहा महिन्यांपासून सक्रीय होती. याउलट काँग्रेस कार्यकर्त्यांमधील मरगळ आणि समन्वयाचा अभाव हा अगदी मतदानाच्या दिवसांपर्यंत कायम राहिल्याचे चित्र होते.
पंचायत समितीच्या वारुंजी गणामध्ये समाविष्ट एकूण 5 गावांपैकी काँग्रेसला गोटे गावात 90 तर वनवासमाचीत 75 मतांचे लिड मिळाले. याउलट भाजपने वारुंजीत 561, मुंढे गावात 704 आणि खोडशीत 248 मतांचे लिड घेतले. भाजपला वारुंजी पंचायत समिती गणात 1348 चे मताधिक्य मिळाले. ही पाचही गावे पुर्वी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट होती. त्यामुळे माजी सहकारमंत्री आ.बाळासाहेब पाटील यांना माणणारा मोठा वर्ग या प्रत्येक गावात आहे. त्यांना मानणारे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रीतपणे प्रचाराचे प्रभावी काम केल्याने या पंचायत समिती गणात डॉ.अतुल भोसले यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. तर पंचायत समिती कोयना वसाहत गणामध्ये समाविष्ट चचेगाव, चौगुलेमळा, धोंडेवाडी, नांदलापुर, जखिणवाडी, कोयनावसाहत आणि कालेटेक या सर्व गावांमध्ये भोसले यांना मताधिक्य मिळाले. कोयना वसाहत पंचायत समिती गणात भोसले यांना 1348 मते जास्त पडली. एकट्या कोयनावसाहत या कृष्णा हॉस्पिटलचा सर्वाधिक परिणाम असणार्या गावात अतुल भोसले यांना तब्बल एक हजार मतांचे लिड मिळाले. तर जखिणवाडीत भोसलेंना चव्हाण यांच्यापेक्षा 17 मते जास्त मिळाली.
काँग्रेसचे कराड दक्षिणचे अध्यक्ष व मलकापुरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचे मलकापूर प्रमाणेच वारुंजी जि.प.गटात उत्तम संपर्क आणि बारीक लक्ष असते. मात्र यावेळी ते स्वतः मलकापुरात जास्त अडकून पडले. कृष्णा हाँस्पिटल व उद्योग समुह हा सुध्दा याच जि.प.गटाच्या पंचक्रोशीत येत असल्याने डॉ. अतुलबाबा भोसले यांनी या समुहांच्या माध्यमातुनही मतदारसंघात यशस्वी बांधणी केल्याचे दिसून येते. अॅड.उदयसिंह पाटील यांना मानणारा स्वतंत्र वर्ग प्रत्येक गावात आहे. त्यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून कार्यकर्ते चार्ज करण्याचा खुप प्रयत्नही केला, मात्र भाजपचे मताधिक्य कमी करण्यास त्यांचेही प्रयत्न कमी पडले. कराड दक्षिणमधील काँग्रेसची भविष्यातील धुरा अॅड.उदयसिंह पाटील आणि मनोहर शिंदे या जोडीवरच असणार आहे. परिणामी या निवडणुकीत झालेला काँग्रेसचा मोठा पराभव स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. यातून बाहेर काढण्यासाठी या दोघांना मोठे प्रयत्न करावे लागतील. तर लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही मिळालेले यश वारुंजी गटातील प्रत्येक गावामध्ये भाजप क्रायकर्त्यांना उत्साही करणारे ठरले .