कराड ः अफजलखान वधासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष...छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठी बलिदान दाखविणारा ‘छावा’ चित्रपटातील क्षण...आकर्षक वेशभूषेद्वारे साकारलेले शिवाजी महाराज, शाहू महाराज, मावळे अन् ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय’ असा जयघोष करणारे हजारो आबालवृद्ध अशा भव्यदिव्य दरबार मिरवणुकीने शिवजन्मोत्सवाची सांगता झाली.
महाराष्ट्रातील मोठ्या दरबार मिरवणुकींपैकी एक मिरवणूक म्हणून ओळख असणारी कराड शहरातील ही दरबार मिरवणूक पाहण्यासाठी कराड तालुक्याच्या विविध गावातील लोकांसह परजिल्ह्यातील हजारो अबालवृद्ध उपस्थित होते.
हिंदू एकता आंदोलन समितीकडून मागील 55 वर्ष अक्षय्यतृतीयेला पारंपारिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली होती. सोमवारी सायंकाळी चावडी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्यानंतर मंगळवारी कराड शहरातील विविध गणेश मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. त्यानंतर मंगळवारपासून बुधवारपर्यंत शिवजयंतीचे औचित्य साधत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सालाबादप्रमाणे दरबार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, विनायक पावसकर, विष्णू पाटसकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पांढरीचा मारूती मंदिरानजीक या मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत सहभागी श्रीराम, हनुमान यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत होत्या. तर हत्तीवर विराजमान होत छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा केलेला युवक आकर्षणाचा केंद्रबिंदू होता.
याशिवाय टीम वसंतगड, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून गडकिल्ले संवर्धनाबाबत युवा पिढीमध्ये चित्ररथाद्वारे तसेच प्रबोधनात्मक फलकांद्वारे जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय धनगर समाजाचे पारंपारिक नृत्य, वारकरी अन् लेझीम नृत्य याद्वारे सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा प्रयत्न या मिरवणुकीद्वारे करण्यात आला. कराडमधील पांढरीचा मारूती मंदिरापासून सुरू झालेली ही मिरवणूक कन्याशाळा, चावडी चौक, आझाद चौक मार्गाने शिवतीर्थ (दत्त चौक) परिसरात आली आणि तेथे सांगता झाली.