कराडमध्ये नामांकित बेकरी सील File photo
सातारा

Bakery Sealed : कराडमध्ये नामांकित बेकरी सील

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; तुकाराम मुंढे यांच्या दौऱ्यापूर्वी कारवाईने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड शहरात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या नामांकित दिवेकर बेकरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत बेकरी सील केली आहे. तसेच पार्सल सेवा पुरविणाऱ्या एका बड्या कंपनीवरही कारवाई करून तिच्या कामकाजावर निर्बंध आणण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त तुषार शिंगाडे यांनी आज ही माहिती दिली. या कारवाईमुळे शहरातील व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दिवेकर बेकरीमध्ये अस्वच्छता असल्याबाबत विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत उपायुक्त शिंगाडे आणि त्यांच्या पथकाने संबंधित बेकरीची तपासणी केली. या तपासणीदरम्यान तक्रारीच्या अनुषंगाने अस्वच्छता तसेच अन्य त्रुटी आढळून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुढील आदेश मिळेपर्यंत बेकरी सील करण्याची कारवाई करण्यात आली.

दरम्यान, पार्सल सेवा पुरविणाऱ्या एका नामांकित कंपनीवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली असून, संबंधित सेवेचे कामकाज बंद ठेवण्याबाबत निर्बंध घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या पार्सल सेवेचे नाव आणि कारवाईचे नेमके कारण याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे उद्या (ता. १७) येथे पालिकेच्या व्याख्यानमालेसाठी येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विभागाने केलेल्या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत अन्नपदार्थांच्या स्वच्छतेसह अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी प्रशासनाकडून केली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT