Karad drug racket: दुर्गम डोंगरी परिसरात ड्रग्जचा काळाबाजार Pudhari
सातारा

Karad drug racket: दुर्गम डोंगरी परिसरात ड्रग्जचा काळाबाजार

कराडच्या पाचुपतेवाडीतील कारवाईने खळबळ; स्थानिक पोलिस मात्र अनभिज्ञच

पुढारी वृत्तसेवा

कराड : उंडाळे विभागातील तुळसण परिसरातील पाचुपतेवाडी (ता. कराड) गावात डीआरआय पुणे प्रादेशिक विभागाच्या पथकाने अत्यंत गुप्तपणे छापा टाकला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून जावळीतील दुर्गम भागापाठोपाठ कराड तालुक्यातही दुर्गम डोंगर परिसरात अंमली पदार्थाचा काळाबाजार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. मात्र जावळीप्रमाणेच कराडमध्ये स्थानिक पोलिस अनभिज्ञ असल्याचे समोर आल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयिताच्या मालकीचे कोंबडी पालनासाठी उभारलेले शेड डोंगर रांगेलगत असून हा परिसर दुर्गम मानला जातो. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेची मराठी शाळा या शेडच्या अगदी पाठीमागील बाजूस आहे. कोंबडी पालन व्यवसायाच्या नावाखाली याच शेडमध्ये अमली पदार्थांची निर्मिती व काळाबाजार सुरू असल्याची जोरदार चर्चा आता परिसरात सुरू झाली आहे. या कारवाईपूर्वी मागील तीन दिवसांपासून एका दुचाकीवरून एक व्यक्ती या परिसरात टेहळणी करत होता आणि ही व्यक्तीच डीआरआय विभागाची अधिकारी होती असेही स्थानिक सांगत आहेत.

शनिवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तीन वेगवेगळ्या गाड्यांमधून साध्या वेषातील अधिकारी अचानक शेड परिसरात दाखल झाले. त्यांच्यामागोमाग दोन पोलिस वाहने आणि एक रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली होती, असे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

अधिकारी शेडमध्ये पोहोचताच संशयित तेथेच आढळून आला. प्राथमिक चौकशी केल्यानंतर अधिकाऱ्यांनी थेट गावातील त्याच्या घराकडे मोर्चा वळवत झाडाझडती घेतली. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अखेर संशयिताला रात्री ताब्यात घेण्यात आले. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात परजिल्ह्यातील पोलिसांनी आमली पदार्थ निर्मितीच्या ठिकाणी मोठी धाड टाकली होती. त्यामुळे पाचुपतेवाडीतील ही कारवाई जावळीतील घटनेशी संबंधित आहे का? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मात्र कराड पोलिसांकडे या कारवाईची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याने उशिरापर्यंत सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. संपूर्ण कारवाई दरम्यान गावात कुणालाही माहिती होऊ नये इतकी गुप्तता पाळण्यात आल्याने ही धाड अधिकच रहस्यमय ठरली आहे. पुढील तपासातून नेमके काय उघडकीस येते? याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT