सातारा

Karad Rain: कराड तालुक्यात पावसाचा जोर वाढला

कृष्णा-कोयना पाणीपातळीत वाढ, जनजीवन विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून बुधवारी दिवसभर पावसाची अखंड रिपरिप सुरू होती. सततच्या पावसामुळे संपूर्ण परिसर ढगांनी आच्छादित झाला असून दिवसा देखील काळोखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे कृष्णा व कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून लहान-मोठ्या तलावांमध्येही पाणीसाठा वाढू लागला आहे. धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस सुरू असल्याने जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.

दुसरीकडे, तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीची कामे अंतिम टप्प्यात असून अनेक ठिकाणी टोकणीची कामे सुरू आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतीची कामे काही प्रमाणात विस्कळीत झाली आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतरच शेतकऱ्यांना टोकणी, खते देणे व इतर मशागतीची कामे वेगाने करता येणार आहेत.

सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. बाजारपेठेतही ग्राहकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून आले. हवामान ढगाळ असल्याने दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.

परिणामी वातावरणात गारवा वाढला असून नागरिकांनी पावसापासून बचावासाठी छत्री व रेनकोटचा आधार घेतला. शेतकरी मात्र या पावसामुळे खरीप पिकांना चांगला आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT