कराडच्या उड्डाण पुलाला ‌‘तारीख पे तारीख‌’ 
सातारा

Satara News : कराडच्या उड्डाण पुलाला ‌‘तारीख पे तारीख‌’

उड्डाण पुलाच्या ॲप्रोच रस्त्याचे काम संथ गतीने; यापूर्वीच दोनदा मुदतवाढ

पुढारी वृत्तसेवा

चंद्रजित पाटील

कराड ः पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. याच कामांतर्गत कराडजवळ नवा उड्डाण पूल उभारण्याचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, अजूनही काम 80 ते 85 टक्केच झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे उड्डाण पुलास जोडणारा कोल्हापूर नाका परिसरातील ॲप्रोच रस्ता अद्यापही पूर्ण झाला नसून सध्यस्थिती पाहता हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अवघडच आहे. यापूर्वी तीनदा या उड्डाण पुलाचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन तीनदा संपली असून, दोनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, असे असूनही आजही तारीख पे तारीख दिली जात असल्याचेच दिसत आहे.

जानेवारी 2023 मध्ये मोठा गाजावाजा करत पुणे - बंगळूर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू करत कराडजवळील जुना उड्डाण पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यानंतर जुलै 2024 पर्यंत महामार्गाचे काम गतीने सुरू होते. मात्र त्यानंतर मुख्य ठेकेदार कंपनी अदानी आणि सबठेकेदार कंपनी डी. पी. जैन यांच्यातील आर्थिक मतभेद उफाळून आले आणि त्याचा कामावर परिणाम झाला. त्यामुळेच डिसेंंबर 2024 मध्ये पूर्ण होणारे काम फेब्रुवारी 2026 संपत आला तरी पूर्ण होऊ शकलेले नाही. कराडजवळ सुमारे साडेतीन किलोमीटरचा उड्डाण पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी डी. पी. जैन कंपनीकडून नोव्हेंबर 2024 पर्यंत पुलाचे काम पूर्ण केले जाईल असे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना सांगण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर 17 जून 2025 पर्यत या कामाला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र ही मुदतवाढ संपल्यानंतर नोव्हेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करू असे सांगण्यात आले होते. मात्र ही मुदत संपून तीन महिने झाले तरी अजूनही 80 ते 85 टक्केच काम पूर्ण झाल्याचे ठेकेदार कंपनीसह महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे. कोल्हापूर नाका परिसरातील कोयना नदीवरील महामार्गाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूच्या पुलांचे काम कासवगतीने सुरू आहे. कोल्हापूर नाका ते मलकापूर या दरम्यानच्या सेवा रस्त्याच्या कामास सुरूवातच करण्यात आलेली नाही. आता कंपनीकडून जूनची मुदत दिली जात आहे. मात्र कामाची सध्याची परिस्थिती पाहता हे काम जूनपर्यत तरी पूर्ण होणार का ? हाच मोठा प्रश्न आहे.

सेवा रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने मागील तीन वर्षापासून मलकापूरमधील स्थानिक रहिवाशी अक्षरशः मरणयातनाच भोगत आहेत. याशिवाय वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहन चालकांना पुढील वाहन गेल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि तासन्‌‍तास एकाच जागेवर हताशपणे वाहन उभे करावे लागते. त्यामुळे मुजोर ठेकेदारी कंपनीला कोणाचे अभय आहे ? स्थानिकांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसह प्रवाशांचे हात आणखी किती दिवस होत राहणार? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

(क्रमशः)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT