सातारा

Pudhari Campus to Career Seminar: आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग करिअरच्या संधी निवडा

पुणेतील तज्ज्ञांचा विद्यार्थ्यांना सल्ला; कराड येथे पुढारी कॅम्पस टू करिअर सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

कराड : विद्यार्थ्यांनी करिअरचा विचार करत असताना आवडीच्या क्षेत्रात जाता येईल का? हे पाहिले पाहिजे. करिअर करायचे झाल्यास ५०० पेक्षा जास्त पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आवडीच्या क्षेत्रात उत्तुंग करिअर करण्याची संधी विद्यार्थ्यांनी निवडली पाहिजे. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग नव्हे तर गुणवत्तेचे युग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणातील बदल स्वीकारणे गरजेचे आहे. ज्यामध्ये आपण उत्कृष्ट आहोत ते विद्यार्थ्यांनी नक्की करावे, असा सल्ला पुणे येथील विविध विद्यापीठांच्या तज्ज्ञांनी दिला.

कराड येथे दैनिक ‘पुढारी’ व पिंपरी -चिंचवड विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, विश्वकर्मा विद्यापीठ व डिजीटेक रोबोटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पुढारी कॅम्पस टू करिअर या करिअर मार्गदर्शन सेमिनारमध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. स्वप्नील सोनकांबळे, डॉ. प्रशांत आचार्य, मुकेश अगरवाल, अजित गट्टे, शंतनु देशपांडे, सुनील लोंढे, सतीश मोरे यांच्यासह कराड मधील विविध कॉलेज व अकॅडमीचे शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. स्वप्निल सोनकांबळे म्हणाले, करिअरचा विचार करत असताना एक दोन वर्षांचा नव्हे तर पुढील ३५ ते ४० वर्षे आवडीनुसार जगत असताना स्टेटस निर्माण व्हावा असे करियर निवडले पाहिजे. कराडमधील मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. इंजिनियरिंगमध्ये करिअरच्या दृष्टीने अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. बी टेक, बी ई कोणताही पर्याय निवडू शकता. मेडिकल, लॉ चा ही चांगला पर्याय निर्माण होऊ शकतो. आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी उत्तम करिअर करावे. आपल्याला आवड असली तरी त्या क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध आहे का हेही पाहणे गरजेचे आहे.

मुकेश अगरवाल यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांविषयी माहिती दिली. तसेच कमी मार्क्स मिळाले म्हणून चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळणार नाही असे न समजता मुलांनी चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एखाद्या कॉलेजला किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत असताना त्याचा पाठीमागील तीन वर्षांचा परफॉर्मन्स बघणे गरजेचे आहे. इंजीनियरिंग शिवाय इतर अनेक ठिकाणी करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

अजित गट्टे म्हणाले, बर्‍याच वेळेला विद्यार्थी स्पर्धेच्या मागे लागून स्पर्धा करत बसतो. पण तरीही यश मिळतेच असे नाही. त्यामुळे शिक्षण ही अशी गोष्ट आहे ती आपल्याला कायमस्वरूपी घेता आली पाहिजे. प्रत्येक वेळी आपण सतर्क राहिले पाहिजे. बारावीनंतर स्पर्धेचे नव्हे तर स्किलचे तसेच ज्ञानाचे युग आहे. त्यामुळे शिक्षणात होत असलेले बदल स्वीकारून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करिअरची संधी शोधावी. ज्यामध्ये आपण उत्कृष्ट आहोत त्यामध्ये करिअर करत असताना आपली स्वतःची किंमत करणे गरजेचे आहे. यापुढे ज्ञानाशिवाय काहीही करता येणार नाही. मुलांना या प्रवाहात परफेक्ट नॉलेज मिळणे गरजेचे आहे. सर्व टेक्नॉलॉजी सोप्या आहेत पण त्या आत्मसात केल्या पाहिजेत. ज्याला ज्याची गरज आहे त्याला ते ज्ञान देणे व त्यामध्ये तो विद्यार्थी परफेक्ट बनणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाने वेळेची किंमत करायला शिकलं पाहिजे.

शंतनु देशपांडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी करिअरचा विचार करत असताना २०४० मध्ये जग कसे असेल याचा विचार करून करिअर निवडले पाहिजे. एआय व कॉम्प्युटर याचा काहीही संबंध नाही. ताकद व कुवत यावर आपले पुढील निर्णय घ्यावेत. भविष्यात जगणे या खेळालाही मार्गदर्शकाची गरज पडणार आहे. कोणत्या क्षेत्राची किती प्रगती होईल याचा विचार करून करिअरच्या संधी निवडल्या पाहिजेत.

यावेळी डॉ. प्रशांत आचार्य, सार्थक दातीर यांनीही मार्गदर्शन केले. सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे तज्ञाने निरसन केले. यावेळी लिगाडे पाटील कॉलेजचे अध्यक्ष बाजीराव पाटील, ब्रिलियंट ॲकॅडमीच्या संस्थापिका रूपाली पाटील, सुभीत आयआयटीचे सुभीत यादव, घारे अकॅडमीचे प्रमुख प्रा. पी. बी. घारे, प्राचार्या शिला पाटील, प्रा. निरंजन पाटील, प्रा. पराग पाटील आदींचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT