सतीश मोरे
कराड म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो प्रीतीसंगम. सह्याद्रीच्या कुशीतून अविरत वाहत आलेल्या कृष्णा आणि कोयना या दोन जीवनदायिनी नद्यांचा पवित्र संगम. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय इतिहासात ज्याला एक वेगळं स्थान आहे असा हा परिसर. या संगमाच्या काठावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांची समाधी आहे. या नदीकाठाने अनेक पिढ्यांना समृद्धी दिली, शेतीला जीवन दिलं, गावोगावी हिरवाई फुलवली, हजारो कुटुंबांची तहान भागवली आणि कराडला एक वेगळी ओळख दिली. मात्र आज मनात एक वेदनादायी प्रश्न उभा राहतो या कृष्णा-कोयना नद्यांनी कराडला समृद्ध केलं, पण आपण या नद्यांना काय दिलं?
खरं तर, कराडकरांनी आज स्वतःच्या संस्कृतीचा, संवेदनशीलतेचा आणि निसर्गप्रेमाचा आरसाच मलिन करून टाकला आहे. कारण ज्या नद्यांना आपण “कृष्णामाई”, “कोयनामाई”, “माऊली” म्हणतो, त्या नद्यांची अवस्था आज अक्षरशः कचराकुंडीप्रमाणे झाली आहे. कराड शहरातील नदीकाठ, पूल, नदीकडे जाणारे रस्ते, महामार्गालगतची मोकळी जागा सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसते. प्लास्टिकच्या पिशव्या, फुटलेल्या काचा, जुन्या गाद्या, खराब भाज्या, देवांच्या मूर्ती, निर्माल्य, घरातील सडकी घाण जणू काही नदी म्हणजे शहराचा कचरा विसर्जित करण्यासाठी राखून ठेवलेली जागाच आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे चित्र केवळ दुर्दैवी नाही, तर कराडच्या सामाजिक संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे.
अलीकडेच एका सामाजिक संस्थेने प्रीतीसंगम परिसरात श्रमदान करून नदीतून टनावारी कचरा बाहेर काढला. हा कचरा आकाशातून पडलेला नव्हता. तो बाहेरून आलेलाही नव्हता. तो आपणच कराडकरांनी नदीत टाकलेला होता. ही वस्तुस्थिती जितकी कटू आहे, तितकीच लाजिरवाणी आहे.
कराडमधील कृष्णा पूल, जुना कोयना पूल आणि नवा कोयना पूल हे खरं तर दळणवळणासाठी उभारलेले आहेत. मात्र आज या पुलांचा वापर काही लोक अक्षरशः “कचरा फेकण्याच्या ठिकाणा”सारखा करताना दिसतात. रात्री-अपरात्री घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशवीत भरून आणायचा आणि पुलावरून थेट नदीत फेकून द्यायचा हा काहींचा नित्यक्रम बनला आहे.
विशेषतः जुना कोयना पूल तर अनेकांसाठी आवडतं कचरा-विसर्जन केंद्र ठरला आहे. काही मटन व चिकन विक्रेते कोंबड्यांची पिसं, उरलेले अवशेष आणि दुर्गंधीयुक्त घाण पुलावरून नदीत टाकतात. हेच पाणी पुढे प्रीतीसंगमावर येतं. याच पाण्यात अनेक नागरिक पोहतात, स्नान करतात आणि काहीजण भक्तिभावाने तीर्थ म्हणून ग्रहणही करतात.याहून मोठं विडंबन दुसरं कोणतं असू शकतं?
आपण नदीला “आई” म्हणतो. “कृष्णामाई” म्हणून तिची पूजा करतो. मग आईच्या अंगावर कोण कचरा टाकतो का? आईच्या पाण्यात कोण फुटलेल्या काचा फेकतो का? आईच्या कुशीत घरातील सडकी घाण कोण ओततो का?पण कराडमध्ये हेच घडत आहे.. नदीप्रदूषणाचा प्रश्न केवळ शहरापुरता मर्यादित राहिलेला नाही. नदीकाठच्या अनेक गावांमधून थेट ड्रेनेज नदीत सोडलं जात आहे. काही ग्रामपंचायती नदीकिनारीच कचऱ्याचे ढीग टाकतात. वारा, पाऊस आणि प्रवाहाच्या माध्यमातून हा सर्व कचरा अखेर कृष्णामाईच्या पोटातच जातो.सैदापूरसारख्या समृद्ध ग्रामपंचायतीतही कचरा व्यवस्थापनाचा गंभीर अभाव दिसून येतो. काही ठिकाणी मोठ्या गृहप्रकल्पांचे सांडपाणी आणि घाण थेट कॅनॉलमध्ये सोडली जाते. ही केवळ निष्काळजीपणा नाही; हा पर्यावरणाविरुद्धचा गुन्हा आहे. भविष्यातील पिढ्यांच्या आरोग्यावर घाला घालणारी ही मानसिकता आहे. कराडकरांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे नदी फक्त पाण्याचा प्रवाह नसते. ती संस्कृती असते. ती सभ्यतेची जननी असते. नदी म्हणजे त्या परिसराचं जीवन असतं.1990 च्या दशकात कराडमध्ये कावीळीची भीषण साथ आली होती. दूषित पाण्यामुळे अनेक कुटुंबांनी हालअपेष्टा सोसल्या. इतिहास आपल्याला वारंवार इशारा देतो आहे. जर आजही आपण शहाणे झालो नाही, तर उद्या हीच कृष्णा नदी कराडसाठी संकट बनू शकते.
नदीतील जलचर नष्ट होतील. शेतीवर परिणाम होईल. दूषित पाणी गावोगावी पोहोचेल. अनेक आजार पसरतील. निसर्गाचं संतुलन बिघडेल. आणि त्या सर्व परिणामांना सामोरं जावं लागेल ते पुन्हा आपल्यालाच. कराडकरांनो, कृष्णा-कोयना आपल्या घरात आहेत, हा अभिमान नक्की बाळगा. पण त्या नद्यांचा अपमान करून अभिमान टिकत नाही. नदीकाठ स्वच्छ ठेवणं, कचरा व्यवस्थापन करणं, नदीत घाण टाकणाऱ्यांना रोखणं ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही; ती प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे.
आज वेळ आहे बदलण्याची. नदीला पुन्हा “माई” मानण्याची. नदीवर प्रेम करण्याची. निसर्गाशी प्रामाणिक राहण्याची. नाहीतर भविष्यात एक दिवस कृष्णामाईच कराडकरांना प्रश्न विचारेल “मी तुम्हाला आयुष्यभर समृद्ध केलं पण तुम्ही मला काय दिलंत ?”आणि त्या दिवशी कराडकरांकडे उत्तर नसेल.