Pudhari File Photo
सातारा

Karad Politics: कराडमध्ये महाविकास आघाडीसह महायुतीत फूट

काँग्रेसचा ‌‘एकला चलो‌’चा नारा; भाजपविरोधात राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड नगरपरिषदेसाठी नाट्यमय घडामोडी घडल्या असून, महायुतीसह महाविकास आघाडीत फूट पडली आहे. भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे, तर काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत ‌‘एकला चलो‌’ असा नारा दिला आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी 9, तर नगरसेवकपदासाठी 109 असे एकूण 118 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी शिवसेना शिंदे गट तथा यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. त्यानंतरही काँग्रेसने आपली भूमिका कायम ठेवत नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदाच्या 15 जागांवर स्वतंत्रपणे पक्ष चिन्हावरच लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. काँग्रेसने अल्पसंख्याक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकीर पठाण यांना नगराध्यक्षपदाची उमदेवारी दिली आहे, तर भाजपने यापूर्वीच ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी पक्ष चिन्हावर निवडणुकीस सामोरे न जाता यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या तिघांसह बसपाने इम्रान मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक, सामाजिक कार्यकर्ते रणजितनाना पाटील यांनीही अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. त्यांच्यासह शरद देव, श्रीकांत घोडके, गणेश कापसे, बापू लांडगे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. कराडात आता भाजपविरोधात शिवसेना शिंदे गट आमने-सामने आला असून, त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीची साथ आहे.

तर राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत पक्ष चिन्हावर निवडणूक लढविण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने फारकत घेत एकला चलो असा नारा दिला आहे. त्यामुळेच कराडात महायुतीसह महाविकास आघाडीत नगरपालिका निवडणुकीसाठी एकमत झाले नसून फूट पडल्याचे समोर आले आहे. यशिवाय 31 नगरसेवक पदासाठी 109 उमेदवार रिंगणात उतरले असून तिरंगी लढतीत मतविभाजन निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT