कराड, पुढारी वृत्तसेवा : कराड शहर व परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच कराडच्या बुधवारपेठेत 1 किलो गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या या कारवाईत 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पोलिसांनी संशयितस ताब्यात घेतले आहे.
गणेश संजय वायदंडे (रा. बुधवारपेठ, कराड) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहरात एक संशयित पांढर्या रंगाच्या मोपेडवरून लोकांना गांजा पुरवत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला कराड शहर व परिसरात सापळा रचून संशयिताच्या हालचालींवर नजर ठेवण्याच्या सुचना दिल्या.
दरम्यान, रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी कृष्णा नाका परिसरात संशयित युवक गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अलर्ट झाले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक राजू डांगे, प्रविण जाधव, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, पोलीस हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, रईस सय्यद, सोनाली पिसाळ या पथकाने संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडे झडती घेतली. गाडीचीची तपासणी केली असता त्यामध्ये एक किलो गांजाचा साठा आढळून आला.
पोलिसांनी गाडीसह संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईचे पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी अभिनंदन केले. संशयित वायदंडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून या परिसरात आणखी काही संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.