कराड : दुचाकी चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात कराड शहर पोलिसांना यश मिळाले आहे. अंधारवाडी (उंब्रज, ता. कराड) येथील मुख्य संशयितासह तिघांना गजाआड करत सातारा, सांगली, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून संशयितांनी चोरलेल्या सुमारे 17 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गणेश ऊर्फ अभिषेक दादासोा शितोळे (वय 21), विशाल दादासोा शितोळे आणि सुनील संभाजी शेजवळ अशी संशयितांची नावे आहेत. त्याचबरोबर या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
कराड शहर व परिसरातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार अंमलदार सतीश पाटील, संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, संतोष पाडळे, प्रदीप चव्हाण, धिरज कोरडे, संग्राम पाटील यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस संशयितांबाबत माहिती घेत होते. याचवेळी गजाआड करण्यात आलेल्या संशयितांबाबत माहिती मिळाली.
या माहितीची सत्यता पडताळल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोरडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतले आहे. चौकशीतून केवळ साताराच नव्हे तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातूनही संशयितांनी दुचाकी चोरल्याचे समोर आले आहे. 11 यामाहा, स्पेलंडर, केटीएम, प्लसर अशा 17 महागड्या दुचाकींचा यात समावेश आहे. त्यामुळे ज्यांच्या दुचाकी चोरीस गेल्या आहेत, त्यांनी कराड शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी केले आहे.