कराड : कराड शहरात वाढत्या रश ड्रायव्हिंग, टवाळखोरांची गर्दी, भरधाव वेगाने वाहन चालवून नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे प्रकार तसेच शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी कराड शहर पोलिसांनी शनिवारी रात्री शहरात विशेष नाकाबंदी मोहीम राबवली.
कराड शहरातील प्रमुख सहा ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी करत संशयित वाहनधारकांची आणि व्यक्तींची कसून तपासणी करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील व पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील पोपटभाई पेट्रोलपंप, भेदा चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, चावडी चौक, सैदापूर कॅनॉल, दैत्य निवारणी मंदिर तसेच वर्दळीच्या भागांमध्ये पोलिसांकडून विशेष पथके तैनात करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान भरधाव वेगाने वाहन चालविणारे, सार्वजनिक ठिकाणी विनाकारण थांबून टवाळक्या करणारे तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले.
नाकाबंदी दरम्यान दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कागदपत्रे तपासण्यात आली. वाहनचालकांचे परवाने, वाहनांची कागदपत्रे, संशयास्पद हालचाली तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या अचानक कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये धावपळ उडाली होती.