Karad Panchayat Samiti Pudhari
सातारा

Karad Panchayat Samiti: कराड पंचायत समितीत महिला नेतृत्वाचा प्रभाव

स्थापनेपासून अनेक महिलांना सभापतीपदाचा मान; नंदाताई यादव ठरल्या सहाव्या महिला सभापती

पुढारी वृत्तसेवा
अशोक मोहने

कराड : कराड पंचायत समितीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासात महिलांच्या नेतृत्वाचा ठसा ठळकपणे दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असताना कराड पंचायत समितीतही महिलांनी सभापतीपद भूषवून सक्षम नेतृत्वाची परंपरा निर्माण केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत येरवळे येथील नंदाताई यादव यांना सभापतीपदाची संधी मिळाली असून उपसभापतीपदी अनिता वेताळ यांची निवड झाली आहे.

दरम्यान नुतन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीची पहिलीच मासिक सभा शुक्रवारी पार पडत आहे. कराड पंचायत समितीच्या स्थापने नंतर पहिले सभापती म्हणून भिकोबा साळुंखे यांनी 7 ऑगस्ट 1962 ते 1968 या कालावधीत कार्यभार सांभाळला. त्यानंतरच्या काळात विविध राजकीय घडामोडींमधून पंचायत समितीची वाटचाल झाली. विशेषतः 1998 नंतर महिलांच्या नेतृत्वाला चालना मिळाली.

14 मार्च 1999 रोजी खुबी येथील सौ. शोभाताई सुतार या पहिल्या महिला सभापती ठरल्या. त्यावेळी उपसभापतीपदी होते संभाजी यादव. यानंतर ओंड येथील कमल थोरात, कोडोली येथील सौ. सुनंदा कुंभार, किवळ येथील सौ. शालन माळी तसेच सौ. फरिदा इनामदार यांनी सभापतीपद भूषवून महिलांच्या नेतृत्वाची परंपरा पुढे नेली. 2022 पूर्वीपर्यंत पंचायत समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रभाव राहिला. मात्र 2022 मध्ये प्रणव ताटे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक नेमण्यात आला होता.

पाच वर्षांच्या प्रशासकीय कालावधीनंतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा महिलेला सभापतीपदाची संधी मिळाली आहे. यावेळी प्रथमच पंचायत समितीवर भाजपची सत्ता स्थापन झाली असून या सत्तांतरामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे निर्माण झाली आहेत. महिलांच्या वाढत्या सहभागामुळे निर्णय प्रक्रियेत संवेदनशीलता, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

कराड पंचायत समितीच्या महिला सभापती म्हणून यांना मिळाली संधी

1999 : सौ. शोभाताई सुतार (पहिल्या महिला सभापती)

2002 : कमल थोरात

2007 : सौ. सुनंदा कुंभार

2017 : सौ. शालन माळी

2018 : सौ. फरिदा इनामदार

2026 : नंदाताई यादव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT