कराड : कराड शहरातील ४५ रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन वर्क ऑर्डरही निघालेली असतानाही प्रत्यक्ष कामांना सुरुवात न झाल्याने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना चांगलेच धारेवर धरले. घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था, कचरा गाड्यांचे अपुरे नियोजन आणि मान्सूनपूर्व कामांकडे झालेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, आठवडाभरात ठोस निर्णय न झाल्यास पालिकेत बोंबाबोंब आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
शहरात बीपीसीएलची गॅस पाईपलाईन व एअरटेल कंपनीची केबल टाकण्याच्या कामासाठी तीन महिन्यांपूर्वी ठराव होऊनही प्रत्यक्ष कामे सुरू न झाल्याने रस्त्यांची कामे रखडल्याचा मुद्दा बैठकीत आक्रमकपणे मांडण्यात आला. या विलंबाला नेमके कोण जबाबदार, कंपनी की अन्य कोणते कारण, याचा खुलासा करून संबंधित कंपन्यांसमवेत सर्व नगरसेवकांची बैठक घेण्याची मागणी सुमित जाधव यांच्यासह विरोधी नगरसेवकांकडून करण्यात आली.
एसआयआर संदर्भातील कॅम्पवरूनही जोरदार वादंग निर्माण झाला. राजकीय पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे कॅम्प आयोजित करण्याची कोणतीही परवानगी नसताना ते कोणत्या अधिकाराने आयोजित करण्यात आले, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी अशा प्रकारच्या कॅम्पला कोणतीही परवानगी नसून तसे आयोजन झाले असेल तर ते बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले.
याशिवाय प्रितीसंगम बागेतील गैरव्यवस्था, बागांमध्ये भटक्या जनावरांचा वावर, नियमावली व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दर्शविणारे फलक नसणे, धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी व ड्रेनेज स्वच्छतेकडे दुर्लक्ष अशा प्रश्नांवरही विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला.