Karad News | ‘मगर’ बनली संकटाची नांदी! Pudhari Photo
सातारा

Karad News | ‘मगर’ बनली संकटाची नांदी!

नदी पात्रालगत शेती करणारे शेतकरी भयभीत

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड शहर व तालुक्यातील आटके, मालखेड, खोडशी यांसारख्या अनेक नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा एकदा मगरींच्या हालचाली दिसून येत आहेत. यामुळे नदीपात्रालगत शेती करणारे शेतकरी भीतीच्या सावटाखाली काम करत आहेत. दोन वर्षांपूर्वी कराडच्या प्रीति संगम परिसरात नदीत पोहत असलेल्या एका व्यक्तीचा पाय मगरने ओढण्याचा प्रयत्न केल्याचा दावा समोर आला होता. ही घटना लक्षात घेता, सध्याच्या मगरदर्शनांमुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कराड तालुक्यातील आटके, मालखेड, खोडशी, रेठरे, सैदापूर कॅनॉल या नदीकाठच्या गावांमध्ये मागील काही वर्षांपासून मगरींचे दर्शन वाढले आहे. यामध्ये सैदापूर कॅनॉल आणि खोडशी येथे प्रत्यक्ष जिवंत मगरी पकडण्यात आल्याच्या घटना नोंदविण्यात आल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर नदीकाठच्या ऊसशेतीत किंवा काठावरच पहुडलेल्या मगरींचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नागरिकांनी प्रत्यक्ष पाहिल्याचेही सांगितले आहे.

यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कराड तालुका हा प्रामुख्याने कृष्णा, कोयना आणि उरमोडी नद्यांच्या किनार्‍यावर वसलेला आहे. येथे प्रामुख्याने ऊस हे नगदी पीक घेतले जाते. याशिवाय जनावरांच्या चार्‍यासाठीही नदीकाठच्या जमिनींवर भरघोस पीक घेतले जाते. अनेक शेतकर्‍यांनी खाजगी पाणी योजना उभारल्या असून या योजनांचे पंप, मीटर व वीज यंत्रणा थेट नदीकाठीच असतात. सप्टेंबरनंतर मे महिन्यापर्यंत या शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वीजपुरवठ्याच्या वेळेत शेतकर्‍यांना नदीकिनारी जावे लागते. अशा वेळी मगरींचा वावर प्राणघातक ठरू शकतो.

दोन वर्षांपूर्वी कराड शहराच्या प्रीतिसंगम परिसरात पोहत असलेल्या एका व्यक्तीच्या पायाला मगरीने पकडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्या व्यक्तीचा जीव सुदैवाने वाचला असला तरी ही घटना आजही नागरिकांच्या लक्षात आहे. त्यानंतर आता मगरींचे दर्शन वारंवार होत असल्याने नागरिक व शेतकरी दोघेही चिंता व्यक्त करत आहेत. महिला, वयोवृद्ध शेतकरी व चराईसाठी जाणारे युवकदेखील यामुळे सावध झाले असून, अनेक शेतकर्‍यांनी रात्रीच्या वीजपुरवठ्यात शेतात जाणे टाळले आहे.

मात्र पाण्याची गरज भागवायची असल्याने धोका पत्करून जाणे अटळ ठरत आहे. शेतकर्‍यांनी वन विभागाकडे मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असून, तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सोशल मीडियावरून व ग्रामस्थांच्या तोंडी जोर धरू लागली आहे. सुरक्षितता आणि जीवित हानी टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

पुराच्या पाण्याने मगरीच्या उन्हाला पडायच्या जागा डिस्टर्ब झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व नवीन जागेत आढळून येत आहे. पुरानंतर काही दिवसांनी मगर त्यांच्या पूर्वीच्या वस्तिस्थानाकडे निघून जाते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, जिल्हा सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT