कराड : कापील ता. कराड येथील बोगस मतदानाविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी कराड प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी आंदोलनाचा 99 वा दिवस होता. तरी प्रशासनाने अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
कापील येथे रहिवाशी नसलेल्या कापिलमधील बोगस मतदान प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी गणेश पवार यांनी सुरू केलेले आंदोलन मंगळवारी 99 व्या दिवशीही सुरूच राहिले. कापिल येथील मतदान नोंदणी प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप त्यांनी केला असून, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नोंदी करण्यात आल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात मतदार नोंदणी अधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत पवार यांनी यापूर्वी तहसील व निवडणूक प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनस्थळी त्यांनी बोगस मतदानामुळे लोकशाही प्रक्रियेवर होणाऱ्या परिणामांविषयी माहिती देत प्रशासनाचे लक्ष वेधले.
गणेश पवार यांनी सांगितले की, बोगस मतदार नोंदी रद्द करून योग्य ती पडताळणी करण्यात यावी, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. प्रशासनाने वेळकाढूपणा केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडूनही हे आंदोलन गांभिर्याने घेतले जात नाही. प्रशासकीय आचारसंहिता पाळली जात नाही, असा आरोप पवार यांनी केला आहे.