कराड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरीकरणाच्या कामादरम्यान दोन धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. उड्डाण पुलाचे काम सुरू असताना पुलावरून खडा पडल्याने महामार्गावरून मार्गाक्रमण करणाऱ्या कारचे नुकसान झाले. त्यानंतर भरपाई देण्यास नकार दिल्याने संतप्त कार चालकाने ठेकेदार कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यास गाडीत घालून कासेगावपर्यत पळवून नेले. त्यानंतर तडजोड झाल्याने कार चालकाने त्या अधिकाऱ्यास सोडून दिले. दरम्यान या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नसल्याने अधिक तपशील उपलब्ध होऊ शकला नाही.
पुणे - बंगळूर महामार्गावरील ढेबेवाडी फाटा येथे उड्डाण पुलाचे काम सुरू असताना पुलावरून एका कारवर खडा पडून कारचे नुकसान झाले. त्या कारणावरून कार चालकाने सुरक्षा रक्षकांशी वाद घातला. त्यानंतर संतप्त चालकाने कार थेट उड्डाण पुलावर नेऊन तेथील अधिकाऱ्यास विचारणा केली. यावेळी भरपाई मिळत नसल्याचे पाहून कार चालकाने त्या अधिकाऱ्यास कारमध्ये बसवून त्याला कोल्हापूरच्या दिशेने नेले.
घटनेची माहिती मिळताच डी. पी. जैन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी व सुरक्षा रक्षकांनी पाठलाग करून कासेगाव येथे संबंधित कार अडवली आणि प्रकल्प अधिकाऱ्याची सुटका केली. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये मोठा वाद झाला. अखेरीस तडजोडीनंतर कार चालकास 10 हजार रुपये देऊन प्रकरण मिटविण्यात आले. मात्र कामावेळी दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे कारचे नुकसान झाल्याने संबंधितांनी त्या अधिकाऱ्याला कासेगावपर्यंत नेल्याने या घटनेत नेमकी चूक कोणाची? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
दरम्यान, मलकापूर- नांदलापूर परिसरात महामार्गाच्या कामावर असलेल्या कामगारांना रात्रीच्या वेळी धमकावून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत कामगारांना अडवून दमदाटी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच स्थानिक पोलिसांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.