सातारा

Karad Rain: पहिल्याच पावसात महामार्गावरील सेवा रस्ते जलमय

तासाभराच्या पावसात झाली मोठी गैरसोय; नाल्यांची अवस्‍था ‘असून खोळंबा अन्‌ नसून घोटाळा’सारखी

पुढारी वृत्तसेवा

कराड : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून संथ गतीने सुरू असून प्रमुख गावे व शहरांजवळ उड्डाणपूल उभारणीची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सेवा रस्त्यांवरून सुरू आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने महामार्ग प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत.

कराड शहरापासून हाकेच्या अंतरावरील मलकापूर व नांदलापूर परिसरात अवघ्या तासाभराच्या पावसात सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून तळ्याचे स्वरूप निर्माण झाले. मलकापूरच्या पूर्व व पश्चिम बाजूच्या सेवा रस्त्यांवरही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. उड्डाणपूल अद्याप वाहतुकीसाठी खुला नसल्याने सेवा रस्त्यांचा वापर करण्याशिवाय पर्याय नसल्याचे वाहनचालकांनी सांगितले.

साचलेल्या पाण्यात अनेक वाहने बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. स्थानिक नागरिकांनाही ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागला. मागील दोन ते अडीच वर्षांच्या पावसाळ्यातही महामार्गावरील परिस्थिती समाधानकारक नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आला असतानाही महामार्गालगतच्या नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आगामी पावसाळ्यात आणखी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून महामार्गालगतच्या सर्व नाल्यांची तातडीने सफाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT