सातारा

Karad News: कामे अपूर्ण असताना उड्डाण पूल खुला करण्याची घाई

सध्यस्‍थितीत सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजना शून्य...

पुढारी वृत्तसेवा

कराड : पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सहापदरी उड्डाण पुलाची सातारा-कोल्हापूर एक लेन वाहतुकीला खुली करण्यासाठी घाईगडबड सुरू आहे. मात्र ही घाई गडबड प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची भीती आहे. उड्डाण पुलाची सुरक्षेच्या दृष्टीने सर्व कामे पूर्ण करूनच हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करणे गरजेचे आहे.

सदर उड्डाणपूल २० जूनला खुला होणार अशी सोशल मीडियात चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक वाहनधरक व नागरिकांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. सदर उड्डाण पुलाचा अंतिम भराव अद्याप दोन जुन्या कोयना पुलांना जोडलेला नसताना त्याचबरोबर उड्डाण पुलावर अजूनही कोणतीही स्ट्रीट लाइट्स, सुरक्षेच्या दृष्टीने दुभाजकाचे अपूर्ण काम तसेच संरक्षक कठड्यांना काळे पांढरे पट्टे यासह सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजना अपूर्ण असताना उड्डाण पुलावरील एक लेन वाहतुकीला खुली करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

महामार्गावर कोल्हापूरहून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक नांदलापूरनजीक उड्डाण पुलावर घेऊन उड्डाण पुलाच्या सातारा - कोल्हापूर लेनवरून सुरू करण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुलाच्या कामाची घाई गडबड सुरू केली आहे. मात्र ही घाई गडबड सुरक्षित प्रवासाला छेद देत सुरू असून धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उड्डाण पुलावरील सर्व कामे पूर्ण करूनच वाहतूक सुरू करावी व त्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामांना गती द्यावी जेणेकरून उड्डाण पूल वाहतुकीला सुरू झाल्यानंतर कोणताही प्रकार घडणार नाही. असेही वाहनधारक आपली भूमिका मांडताना सांगत आहे.

उड्डाण पुलाच्या दुसऱ्या लेन वरील एक्सपांशन जॉईंटचे काम अपूर्ण...

उड्डाणपुलाच्या कोल्हापूर-सातारा लेन वरील एक्सपान्शन जॉइंटचे काम अजूनही अपूर्णच आहे. हे काम अपूर्ण असताना उड्डाणपूलाच्या दुसऱ्या लेन वरील वाहतूक सुरू केल्यास या कामामुळे या वाहतुकीला अडथळा तसेच धोका होऊ शकतो. सध्या एक्सपान्शन जॉईंटचे 75 टक्के काम झाले आहे. याशिवाय लेन वरील संरक्षक कठड्यांची काही कामे बाकी आहेत.

कोयना पूल येथे उड्डाण पूल अपूर्ण

उड्डाणपुलाच्या शेवटच्या भागात हॉटेल अमित नजीक उड्डाणपुलाचा भराव जुन्या दोन कोयना पुलाला जोडण्याचे काम बाकी आहे. जोपर्यंत या दोन जुन्या कोयना पुलाच्या दोन्ही बाजूचे दोन नवीन कोयना पूल वाहतुकीला खुले केले जात नाहीत तोपर्यंत दोन जुन्या कोयना पुलाला उड्डाणपुलाचा भराव जोडता येणार नाही. आजच्या स्थितीला या ठिकाणचे काम अद्याप सुरू केलेले नाही. सदरचे काम घाईगडबडीने केल्यास उडण पुलावरील वाहतूक धोकादायक ठरू शकते.

उड्डाण पुलावर पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार...

उड्डाण पुलावर जी लेन वाहतुकीला खुली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्या लेनवर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुलावरील ही वाहतूक धोकादायक ठरू शकते. या लेनवर अजूनही वॉटर आउटलेटचे काम करण्यात आलेले नाही. पुलावर अनेक ठिकाणी चढउतार असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचण्याची शक्यता आहे.

उड्डाण पुलावर केवळ लाईट रिफ्लेक्टरचा मुलामा...

सध्या उड्डाणपुलावर हॉटेल ग्रीन पार्क ते कृष्णा हॉस्पिटल दरम्यान पांढरे पट्टे मारण्यात आले असून त्यावर लाल पांढरे लाईट रिफ्लेक्टर बसवण्याचे काम आज सुरू होते. मात्र कृष्णा हॉस्पिटल पासून पुढे स्ट्रीट लाईटसह सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

उड्डाण पुलावर सूचनाफलक, वेग मर्यादा, वळण, चढ-उतार दर्शवणारे फलक अद्याप लावले नाहीत नांदलापूर ते कोयना पूल या पाच किलोमीटर अंतरातील उड्डाणपूलावर कोणत्याही ठिकाणी सूचनाफलक लावण्यात आलेले नाहीत. वेग मर्यादा, वळण, चढ-उतार दर्शवणारे फलक अद्याप कुठेही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने अशा उपाययोजना गरजेच्‍या आहेत. मात्र सर्व उपाययोजना करण्यात आलेले नाहीत.

पाटण तिकाटण्यापासून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक कोयना पुलावर उड्डाणपुलाच्या भरावाचे उर्वरित काम करण्यासाठी कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक पाटण तिकाटणे येथील पूल संपल्यानंतर नवीन कोयना पुलावर वळवून ती पुढे मार्गस्थ केली जाणार आहे. त्यासाठी माऊली हॉटेल, पलाश मल्टीपर्पज हॉल समोर बॅरिगेट्स लावण्याचे काम सुरू आहे.

अपूर्ण कामे पूर्ण करण्याची ठाकरे गटाच्‍या नगरसेवकांची मागणी

कोल्हापूर नाका परिसरातील अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक सुरू केल्यास अपघातांना निमंत्रण मिळणार आहे. अगोदर काम संथ गतीने सुरू असताना आता जी तत्परता दाखविली जात आहे, तीच तत्परता यापूर्वी दाखविली असती तर यापूर्वीच पूल वाहतुकीसाठी खुला झाला असता. त्यामुळे अगोदर अपूर्ण कामे पूर्ण करा आणि मग वाहतूक सुरू करा, अशी मागणी मलकापूरचे नगरसेवक नितीन काशिद यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT