कराड : कराड नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध गटांकडून अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. शुक्रवार दि. 16 रोजी ही निवड होत आहे. स्वीकृत नगरसेवकपद निवडीच्या पार्श्वभूमीवर संबंधित गटांचे नेते कोणावर विश्वास टाकणार, याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
दीर्घकाळ पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार की संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने नव्या, अभ्यासू आणि सामाजिक कामाचा अनुभव असलेल्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाणार, हा सध्या कळीचा मुद्दा ठरत आहे. भाजप, यशवंत आघाडी व लोकशाही आघाडीसाठी अनेक नावे पुढे येत असून प्रत्येकाला एक एक वर्ष संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. यासाठी इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी, संपर्क आणि लॉबिंग वाढवले असून विविध गटांत हालचाली तीव्र झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही नेते जुने व निष्ठावान कार्यकर्ते नाराज होऊ नयेत. यासाठी त्यांनाच संधी देण्याच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करता नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यास पक्षाची प्रतिमा अधिक मजबूत होईल, असे मतही व्यक्त केले जात आहे. स्वीकृत नगरसेवकसाठी असणाऱ्या नियमानुसार भाजपला एक, यशवंत आघाडी एक व लोकशाही आघाडीला एक असे तीन पदे स्वीकृत नगरसेवकांसाठी घेता येणार आहे. आपआपल्या गटाशी प्रामाणिकपणे काम करणारे आणि पार्टीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी एकनिष्ठेने निवडणुकीत काम करणाऱ्या निष्ठावंतांचा विचार गटनेत्यांना करावा लागणार आहे. त्यामुळे पाच वर्षांत प्रत्येकाला संधी दिली जाईल अशी चर्चा आहे.
भाजपाचा विचार करता सुहास जगताप यांनी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून भाजपाशी एकनिष्ठ राहात मोठे काम कराड शहरात केले आहे. शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे तसेच त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. मात्र असे असताना त्यांना निवडणूकीत भाजपाकडून तिकिट मिळाले नसल्याने सुहास जगताप यांचे समर्थकांमधून तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे. त्यामुळे आ. भोसले त्यांचा विचार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर स्मिता हुलवान यांनी यशवंत आघाडीतून भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांचा धक़्कादायक असा पराभव झाला. त्यामुळे आ. डॉ. अतुल भोसले स्मिता हुलवान यांची स्वीकृतसाठी विचार करतील अशी चर्चा आहे.
माजी नगरसेविका संगिता संजय शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला. डॉ. अतुल भोसले यांच्या आदेशावरून त्यांनी स्वतःचा प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढविली. सौ. शिंदे यांचे पती संजय शिंदे हे डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा व एकनिष्ठतेचा विचार डॉ. भोसले यांनी करावा अशी चर्चा आहे. रमेश मोहिते यांनी त्यांच्या पत्नी सौ. स्वाती मोहिते यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. केवळ 13 मतांनी त्यांचा पराभव झाला. रमेश मोहिते यांचे भाजपासाठीचे योगदान आहे. भाजपासाठी एकनिष्ठ असणारे राजीव डुबल, किरण मुळे यांचीही वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यशवंत आघाडीचे नेते नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांचे समर्थक आणि यशवंत आघाडीशी एकनिष्ठ असणारे हणमंतराव पवार यांनी प्रभाग नऊमध्ये त्यांच्या पत्नी विजया पवार यांचा अर्ज दाखल केला. मात्र नेत्यांच्या सांगण्यानुसार अर्ज मागे घेतला. त्यांना कट्टर यादव समर्थक मानले जाते. त्यांनी यापूर्वी दोनदा नगरसेवक पद भूषविले असल्यामुळे ते अनुभवी आहेत. नरेंद्र लिबे हे गेल्या अनेक वर्षापासून यादव यांच्या सोबत आहेत.
यादव यांच्याशी एकनिष्ठपणे ते काम करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते नईम कागदी हे राजेंद्रसिंह यादव यांचे समर्थक आहेत. असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार केला जावू शकतो. यादव यांना निवडणूकीच्या कालावधीत कागदी यांची मोठी मदत झाली होती. मोहसिन कागदी यांनी प्रभाग 10 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. त्यांच्याबाबतही विचार होवू शकतो. तसेच सुधीर एकांडे, रूपेश मुळे यांचीही वर्णी लागण्याबाबत चर्चा आहे. लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांचे नाव स्वीकृतसाठी मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. जयंतकाका पाटील यांना राजकारणाचा मोठा अनुभव असल्याने त्यांच्या नावाची चर्चा असून माजी मंत्री बाळासाहेब पाटील जयंतकाकांचा विचार होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीत उमेदवार म्हणून संधी मिळाली नाही त्यांना आतातरी स्वीकृत म्हणून संधी मिळावी अशी इच्छुकांची अपेक्षा आहे असे दिसते. तर दुसरीकडे पार्टीसाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याची देखील यावेळी आपल्याला स्वीकृत म्हणून संधी मिळावी अशी अपेक्षा असल्याचेही दिसते. नाराज झालेल्या कार्यकर्त्याला स्वीकृतची संधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याची संधी नेत्यांना यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे, अशीही चर्चा आहे.