MLA Atul Bhosale  File Photo
सातारा

Atul Bhosale: आ. अतुल भोसले यांनी निधी दिलेले दोन्ही विषय तहकूब

कराड पालिकेच्या सभेत सत्ताधारी, विरोधकांमध्ये खडाजंगी, शिस्तभंगावरून नगराध्यक्षांची कडक भूमिका

पुढारी वृत्तसेवा

कराड : कराड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची रुंदी, घनकचरा प्रकल्प, एअरटेल व बीपीएलच्या पाईपलाईन आदी मुद्यांवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली. आ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळापासून शहराच्या लगतहून जाणारा नेकलेस रस्ता आणि मंगळवार पेठेतील मोकळ्या भूखंडात बाग विकसित करणे असे दोन महत्वपूर्ण ठराव तहकूब करण्यात आले.

सभेच्या सुरूवातीस सत्ताधारी आणि विरोधकांच्या हमरातुमरीवर नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी आक्रमक भूमिका घेत सभागृहाची शिस्त मोडल्यास सदस्यांच्या निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला. ६९ विषयापैकी ६७ विषय एकमताने मंजूर झाले.

नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे यांच्यासह सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीपासूनच सभागृहात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाल्याने वातावरण तापले होते. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनापासून शहरालगत प्रस्तावित नेकलेस रोड या प्रकल्पाला विरोध का केला जात आहे, असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित करत सत्ताधार्‍यांना धारेवर धरले. विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांनी प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची मागणी केली. त्यावरून दोन्ही गटामध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला. आशुतोष डुबल, अजय पावसकर, प्रविण पवार, अख्तर आंबेकरी, शिवाजी पवार, अल्ताफ शिकलगार यांनी आपली मते मांडली.

नगराध्यक्ष यादव यांनी संबंधित शासकीय विभागाने अद्याप प्रकल्पाचे अधिकृत सादरीकरण केलेले नाही. वारंवार मागणी करूनही माहिती मिळालेली नसल्याने साडेसहा कोटींच्या या महत्त्वाच्या प्रकल्पाला घाईघाईने मंजुरी देणे योग्य ठरणार नाही. कराडकरांच्या हिताचा विचार करून हा विषय सध्या तहकूब करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. सत्ताधारी सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या भूमिकेला समर्थन दिले.

विरोधी पक्षनेते वाटेगावकर यांनी आमदारांनी मंजूर करून दिलेले प्रकल्प आणि निधी वापरायचाच नाही, असा निर्णय घेतला आहे का? असा सवाल उपस्थित करताच पुन्हा वातावरण तापले. विजयसिंह यादव, अख्तर आंबेकरी, जयंत पाटील, प्रवीण पवार, सुहास पवार यांनीही चर्चेत सहभाग घेतला. अखेर भाजपने या प्रकल्पाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले; मात्र सत्ताधार्‍यांनी विषय तहकूबच ठेवला.

मंगळवार पेठेतील मोकळ्या भूखंडावर १ कोटी २० लाखांची बाग विकसित करण्याचा प्रस्तावही सभेत तहकूब करण्यात आला. भाजपने बागेला पाठिंबा दर्शवित आक्रमक भूमिका घेतली. मात्र सत्ताधार्‍यांनी त्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून नगरपालिकेला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याची भूमिका मांडत प्रस्ताव पुढे ढकलला. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील सौर ऊर्जा प्रकल्प विषयही तहकूब करण्यात आला. अल्ताफ शिकलगार यांनी हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असला तरी त्यातून पाणीपुरवठा दिवसातून केवळ एकदाच आणि तोही दीड तास करण्याचे नियोजन असल्याने सर्व सदस्यांचा त्याला विरोध असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, यशवंतराव चव्हाण स्मृती सदनाच्या सुधारणा कामाचा ठराव मंजूर करण्यात आला. यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची घोषणा नगराध्यक्ष यादव यांनी केली. सभेत किशोरी शिंदे यांनी सभेचा अजेंडा सभेच्या आदल्या दिवशी मिळत असल्यामुळे आम्हाला विषयांचा अभ्यास करण्यास कमी वेळ मिळत असल्याचे सांगितले. निलम कदम यांनी प्रभागातील मत मांडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT