Karad news: घर, कागदपत्र जळाले, पण मानवतेची ज्योत विझली नाही Pudhari
सातारा

Karad news: घर, कागदपत्र जळाले, पण मानवतेची ज्योत विझली नाही

परप्रांतीय महिलेचे कराडात सुखरूप बाळंतपण; नगरसेवक दादासो शिंगण यांच्या पुढाकाराने उपचारांना गती

पुढारी वृत्तसेवा

कराड : ओळखपत्र नसल्याने उपचारांपुढे उभ्या राहिलेल्या अडथळ्यांवर मानवतेचा हात ठेवत मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक दादासो शिंगण यांनी एका परप्रांतीय गर्भवती महिलेचे सुखरूप बाळंतपण घडवून आणले. संकटात सापडलेल्या कुटुंबाला वेळेवर मदत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

उत्तर प्रदेशातून उदरनिर्वाहासाठी कराडात आलेल्या दांपत्यावर दुर्दैवाने संकट कोसळले होते. त्यांच्या मूळ गावी लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्याबरोबरच सर्व कागदपत्रे जळून खाक झाली. अशा बिकट परिस्थितीत गरोदर पत्नीसह पती रोजगाराच्या शोधात कराड येथे दाखल झाले. प्रसूतीची वेळ जवळ आल्याने त्यांनी येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी धाव घेतली.

मात्र, आवश्यक कागदपत्रे नसल्याने सुरुवातीला उपचार प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. आधार कार्ड अभावी तपासणी व सोनोग्राफीबाबत अडचणी येऊ लागल्या. खाजगी रुग्णालयातही त्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. वैद्यकीय नियमांच्या चौकटीत अडकलेल्या या दांपत्यासमोर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले.

अखेर स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून नगरसेवक दादासो शिंगण यांच्या सेवाभावी कार्याची माहिती मिळाल्यावर दांपत्याने त्यांची भेट घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शिंगण यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्नाची तातडीने दखल घेण्याची विनंती केली.

आपत्कालीन परिस्थितीत कागदपत्रांच्या अभावामुळे कोणाच्याही जीवाशी तडजोड होता कामा नये, असा ठाम मुद्दा त्यांनी मांडला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संबंधित महिलेला आवश्यक आरोग्य तपासण्या, सोनोग्राफी व प्रसूतीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. काही दिवसांतच तिचे सुखरूप बाळंतपण झाले.संकटसमयी मिळालेल्या या आधारामुळे भावूक झालेल्या दांपत्याने नगरसेवक शिंगण यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT