पाटण : गतवर्षी १५ मे नंतर सुरू झालेला पाऊस जूनमध्येही मोठ्या प्रमाणावर पडल्याने जून महिन्यात धरणात सरासरी १४०० मिलिमीटर पाऊस तर ३१ टीएमसी पाण्याची आवक झाली. उपलब्ध पाणीसाठा ५१ टीएमसी इतका होता. यावर्षी मे मध्ये नाहीच पण जून महिन्यातही अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे पश्चिम वीजनिर्मिती बहुतांश ठप्प तर पूर्वेकडे सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला. आता जुलै व ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या भरवशावर आगामी जलवर्षाचे सिंचन व वीजनिर्मितीचे भवितव्य अवलंबून आहे.
आतापर्यंत धरणांतर्गत विभागात सरासरी केवळ ३०० मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली असून गतवर्षीच्या तुलनेत सरासरी १००० मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे. धरणात सध्या उपलब्ध १४.४८ टीएमसी यापैकी उपयुक्त ९.३८ टीएमसी पाणीसाठा आहे.
गतवर्षी जूनअखेर धरणात ३१.३८ टीएमसी पाण्याची आवक झाली होती याउलट यावर्षी आत्तापर्यंत केवळ ०.६० टीएमसी इतक्याच पाण्याची आवक झाली आहे. याशिवाय अजूनही धरणात पडणारा पाऊस हा जमिनीत मूरत असल्याने पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ व्हायला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.