ढेबेवाडी : कराड तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध आक्षेपार्ह वर्तन तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, संबंधित यंत्रणेकडे तक्रार दाखल करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
महिला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित वैद्यकीय अधिकारी रुजू झाल्यापासून महिला कर्मचाऱ्यांशी अवमानकारक वर्तन करत असून अश्लील भाषेचा वापर, आक्षेपार्ह टिपणी, महिलांचा अवमान करणारे वक्तव्य तसेच कामकाजात अडथळा आणण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याचा आरोप केला आहे.
तसेच, बदली झाल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्याने वैयक्तिक रागातून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘गाडीखाली घालीन, उडवून टाकीन, गावात पाहून घेईन,’ अशा स्वरूपाच्या धमक्या मिळाल्याने स्वतःच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती महिला कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे. ती रोज स्वतःच्या वाहनाने एकटी प्रवास करत असल्याने सुरक्षेची चिंता अधिक वाढल्याचे तक्रारीत नमूद आहे.
विरोध केल्याने नोकरीतून काढण्याची धमकी?
महिला कर्मचाऱ्याने एका प्रसंगी संबंधित अधिकाऱ्याने तिचा हात धरून लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराला विरोध करून तक्रार करण्याची भूमिका घेतल्यानंतर नोकरीतून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी होऊन सत्य समोर यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.