शेखर चरेगावकरांना भोर पोलिसांकडून अटक pudhari photo
सातारा

Karad Fraud : शेखर चरेगावकरांना भोर पोलिसांकडून अटक

साडेसहा कोटींचा अपहार केल्याप्रकरणी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कराड ः राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष भाजप नेते शेखर चरेगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुणे जिल्ह्यात एका माजी नौसैनिकाची फसवणूक करत साडेसहा कोटींचा अपहार केल्याचे समोर आले आहे. भोर पोलिसांनी चरेगावकर यांना गजाआड केले असून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असल्याची माहिती ॲड. नीलेश जाधव यांनी दिली आहे.

प्रदीप रामचंद्र चोरगे (रा. वांगणीवाडी, ता. वेल्हे, भोर, जि. पुणे) यांनी याप्रकरणी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी चरेगावकर यांच्यासह सतीश भगवानदास गुप्ता (चिखली, जि. बुलढाणा), संतोष व्यकंटराव पवार आणि वनिता संतोष पवार (दोघेही रा. लोणंद ताखंडाळा, भोर), श्रीपाद महादेव कुलकर्णी (सिंहगड रोड, पुणे भोर), सुरेंद्र सूर्यकांत काळे (रा. कराड), रोहित भिमराव लभडे (रा. कर्वेनगर पुणे) आणि सुमित बाळासाहेब घोडके (रा. कराड) या संशयितांविरूद्ध चोरगे यांनी तक्रार दिली आहे.

चोरगे हे भारतीय नौसैनिक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर राजमुद्रा डेव्हलपर्स या जमीन खरेदी - विक्री व्यवसाय असलेल्या कंपनीत संचालक झाले होते. सन 2016 - 2017 मध्ये त्यांना भांडवलाची गरज होती आणि त्यामुळे कराडच्या यशवंत बँकेत कर्ज प्रकरण केले होते. कर्ज देतो आणि तुम्ही व्यवसाय सुरू करावा. त्यामध्ये 50 ते 70 टक्के परतावा देतो असे सांगण्यात आले होते. तसेच संतोष पवार, वनिता पवार यांना भेटून घ्यावे असे सांगत त्यांच्या अनेक व्यवसायामध्ये आम्ही भागीदार आहोत. तुमचा फायदा करून देतो असे फिर्यादी चोरगे यांना सांगण्यात आले होते. यशवंत बॅकेला मळे (भोर) येथील 13 हेक्टर 34 आर जमीन तारण देत कर्जासाठी अर्ज केला होता. त्यानंतर यशवंत बँकेसोबतच चिखली को ऑप. बॅकेने 8 कोटींचे कर्ज मंजूर केले होते. ऑगस्ट 2017 मध्ये 1 कोटी 45 लाख रूपये राजमुद्रा डेव्हलपर्स कंपनीच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आणि उर्वरित रक्कम संशयितांनी चोरगे यांची संमती न घेताच परस्पर काढली होती. त्यामुळेच 6 कोटी 55 लाखांचा अपहार केल्याचा दावा करत चोरगे यांनी भोर पोलिसांकडे धाव घेतली होती. याप्रकरणी 5 मे 2024 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भोर पोलिसांनी मुख्य संशयित शेखर चरेगावकर यांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT