Voting  pudhari photo
सातारा

Karad: ’कृष्णा‌’साठी सरासरी ८२.२६ टक्के मतदान

वाठारमधील अपवाद वगळता शांततेत मतदान; उद्या मतमोजणी

पुढारी वृत्तसेवा

कराड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुमारे ७ हजार मयत मतदार वगळता सरासरी ८२.२६ टक्के मतदान झाले. वाठार येथील मतदान केंद्रावर ओळखपत्रावरून उडालेला किरकोळ गोंधळ वगळता सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कराड, वाळवा, कडेगाव, खानापूर या चार तालुक्यांतील १३० गावांमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गटासह विरोधी अविनाश मोहिते गटाचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

रेठरे बुद्रूक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्यात दुरंगी लढत होत आहे. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल आणि विरोधी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे. सहकार पॅनेलचे नेतृत्व विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुलबाबा भोसले करत आहेत. संस्थापक पॅनेलचे नेतृत्व माजी चेअरमन

अविनाश मोहिते यांच्यासह त्यांच्या पत्नी अर्चनाताई मोहिते करत आहेत. कारखान्यासाठी रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मतदान प्रक्रिया सुरू झाली. सातारा आणि सांगली जिल्ह्यात १५३ मतदान केंद्रांमध्ये ५० हजार २५२ मतदारांचा समावेश होता. यापैकी ७ हजार सभासद मयत असून उर्वरित मतदारांपैकी ३५ हजार ५५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकीकडे असे असले, तरी कारखान्याच्या यादीनुसार ५० हजार २५२ मतदारांचा विचार करता सुमारे ७०.७६ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली आहे.

कराड तालुक्यातील ६५ गावांत कारखान्याचे सभासद आहेत. वाळवा तालुक्यातील ४२ गावे, कडेगाव तालुक्यातील २० आणि खानापूर तालुक्यातील ३ गावे अशा एकूण १३० गावांत कृष्णा कारखान्याचे ५० हजारांहून अधिक सभासद आहेत. आता मंगळवार, २३ जून रोजी मतमोजणी होणार असून ही प्रक्रिया कराडमधील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT