मलकापूर : हातगाडे सोडून वाहनांवरील कारवाईमुळे गोंधळ निर्माण झाला. Pudhari Photo
सातारा

Karad News | हातगाड्यांवर मेहरबानी अन् वाहनांवर कारवाई!

कराड वाहतुक पोलिसांचा अजब प्रकार; वाहनधारकांमधून संताप

पुढारी वृत्तसेवा

कराड : माझ्या गाडीवर कारवाई केली मग हातगाड्यांवर का नाही ? असे म्हणत एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसांबरोबरच हुज्जत घातली. या वादावादीत त्याने संबंधित वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांचे व्हिडिओ चित्रीकरण करत पोलिसावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी हातगाडा चालकांसह बघ्यांची गर्दी झाली होती.

कराड शहर वाहतूक शाखा पोलिसांच्या अजब प्रकारामुळे वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. कराड-ढेबेवाडी रस्त्यावर शिवछावा चौक ते दत्त मंदिर परिसरात दुतर्फा चारचाकी वाहने पार्क केलेली असतात. तर त्यापुढे महिला उद्योगपर्यंत खासगी प्रवासी बसेस तसेच अवजड वाहने पार्क केलेली असताता. यामुळे अर्ध्याहून अधिक रस्त्यावर वाहनांचे पार्किंग झालेले असते. परिणामी इतर वाहन चालकांना त्यातून कसाबसा मार्ग काढावा लागतो. रात्रीच्या वेळी अशाप्रकारे बेशिस्त पार्क केलेल्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झालेली असते.

याच परिसरात रस्त्यावरच दोन्ही बाजूला असलेले हॉटेल्स, खरेदीसाठी व कृष्णा रूग्णालयात आलेले वाहनधारक सोयीस्कर म्हणून थेट रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यातच भर म्हणून शिवछावा चौक ते दत्तमंदिर परिसरात रस्त्यावरच दिवसरात्र हातगाडे लावलेले असतात. एवढेच नव्हे तर, चौकासह रस्ता म्हणजे वाहने पार्क करून गप्पागोष्टी करण्याचे सध्या ठिकाण झाले आहे. त्यामुळे येथून जाणार्‍या वाहनांना त्याचा मोठा अडथळा निर्माण होतो.

यावर उपाय म्हणून वाहतूक शाखेचे पोलिस कधीकधी नो पार्किंगची कारवाई करतात. त्याच पद्धतीने वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी कृष्णा सरिता बझारसमोर नो पार्किंगची कारवाई केली. यावेळी एक दुचाकीस्वार आक्रमक झाला. त्याने थेट व्हिडिओ चित्रीकरण करत कारवाई करणार्‍या पोलिसांना प्रश्नावर प्रश्न विचारले. माझ्या गाडीवर कारवाई केली मग तुम्ही या कायम रस्त्यावरच असलेल्या हातगाड्यांवर का कारवाई केली नाही? असा सवाल त्याने विचारला.

युवकाच्या त्या प्रश्नावर मात्र पोलिसांनी कोणतेही उत्तर देता आले नाही. पोलिसाने काहीही उत्तर न देता तेथून काढता पाय घेतला. पोलिस व वाहनधारक युवकाच्या वादावादीचा प्रसंग रस्त्यातच सुरू असल्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पुन्हा काहीकाळी वाहतुक कोंडी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT