Traffic Change File Photo
सातारा

Karad Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी कराडात वाहतुकीत बदल

मिरवणूक मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी

पुढारी वृत्तसेवा

कराड : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये तसेच भाविक, गणेशभक्त आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पोलिसांनी विविध मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर ही वाहतूक व्यवस्था लागू राहणार आहे.

दत्त चौक, आझाद चौक, नेहरू चौक, चावडी चौक, बालाजी मंदिर, झेंडा चौक ते कृष्णा घाट या प्रमुख विसर्जन मिरवणूक मार्गावर दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांना प्रवेश व पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

अवजड वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पोपटभाई पेट्रोल पंपाकडून दत्त चौकाकडे येणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंद राहणार असून, ही वाहने पोपटभाई पेट्रोल पंप, भेदा चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका, विटा मार्ग या मार्गाने वळविण्यात येणार आहेत. तसेच कोल्हापूर नाक्याकडून कृष्णा घाटाकडे जाणारी वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. कृष्णा नाका ते जोतिबा मंदिर, चावडी चौक, कृष्णा घाट या विसर्जन मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश व पार्किंग करता येणार नाही. याशिवाय कृष्णा नाका परिसरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांसाठीही स्वतंत्र वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांमुळे नदीपात्रात गर्दी होऊ नये, यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT