तासवडे टोलनाका : मलकापूर (ता. कराड) परिसरातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, या मार्गांवरून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळ ठरत आहे. गेल्या तीन वर्षांपासून उड्डाणपुलाच्या कामासाठी महामार्गावरील वाहतूक सेवारस्त्यावर वळविण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून ती आजही कायम आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कराडमधील साडेतीन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्य वाहतूक उड्डाणपुलावरून सुरू झाली असली, तरी सेवारस्ते मात्र पूर्वीप्रमाणेच खड्डेमय आणि धोकादायक अवस्थेत आहेत. खरेदी-विक्री पंपाजवळ सेवारस्ता आणि नाल्यादरम्यान मोठी चर पडली असून, या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहेत.
काही ठिकाणी रस्ता अर्धा खचल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे, तर नांदलापूर ते कोल्हापूर नाका या दरम्यान दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे या खड्ड्यांत पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, अपघातांची मालिका सुरूच असून गेल्या तीन वर्षांत अनेकांनी आपले प्राण गमावले, तर काहीजण कायमचे अपंग झाले आहेत.